काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांचा आरोप

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच भीमा कोरेगावप्रकरणी गुन्हा दाखल झालेले संभाजी भिडे यांना आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या दोन तत्कालीन गृहमंत्र्यांनीच मोठे केल्याचा आरोप करीत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राष्ट्रवादीबद्दल संशय निर्माण केला.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी भिडे गुरुजी यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. या मागणीत राष्ट्रवादीही आघाडीवर आहे. वास्तविक राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी भिडे यांना मोठे केले होते, असा आरोपच हुसेन दलवाई यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत केला. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना पोलीस यंत्रणेने मराठवाडय़ात अल्पसंख्याक युवकांचा छळ केला होता. त्यांच्यावर अत्याचार केला होता. त्याच वेळी भिडे यांच्यासारख्यांना राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी पाठीशी घातले होते, अशी टीकाही दलवाई यांनी केली. दलवाई यांचा हा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फेटाळून लावला.

संविधान बचाव यात्रेत काँग्रेसही सहभागी होणार

२६ जानेवारीला संविधान बचाव रॅली मुंबईत काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे समन्वयक असलेल्या या पदयात्रेत काँग्रेसही सहभागी होईल.