काही दिवसांपूर्वी कुर्ला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार मिलिंद कांबळे यांनी स्वतचा वाढदिवस मोठय़ा धुमधडाक्यात साजरा करून हजारोंच्या पंगती उठविल्याची माहिती आता समोर आली आहे. यावर आपण जनतेवरील प्रेमाखातर ही भोजनावळ उठविल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
कुर्ला मतदारसंघाचे आमदार मिलिंद (अण्णा) कांबळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ३ फेब्रुवारीला जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नेहरूनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमाला तब्बल २० ते २२ हजार लोकांची उपस्थिती होती. मैदानाच्या अध्र्या भागामध्ये जेवणावळीची सोय करण्यात आली होती. सायंकाळपासूनच या कार्यक्रमाला लोकांची रिघ लागली होती. संगीताची मैफल पार पडल्यावर भोजनावळी सुरू झाल्या. मुंबईचे पालकमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. संजय दिना पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. रात्री १० वाजता संगीताचा कार्यक्रम थांबविण्यात आल्यानंतरही मंद संगीत सुरूच होते. शाकाहारी आणि मांसाहारी लोकांसाठी वेगवेगळी सोय करण्यात आली होती. इतकेच नाही तर खासगीमध्ये मद्यपानाचाही ‘कार्यक्रम’ सुरू होता. साग्रसंगीत भोजनावर हात मारलेल्या मंडळींनी रात्री उशीरा कुल्र्याच्या नाक्यावर आमदारांचा वाढदिवस नाचून ‘साजरा’ केल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
याबाबत स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. इतर पक्षांचे छोटे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आपापले वाढदिवस मोठे फलक लावून आणि हॉटेलमध्ये जेवण देऊन साजरे करतात. त्यांच्यावरही टीका झाली पाहिजे. ३ फेब्रुवारीचा प्रकार आम्हालाही पसंत नसला तरी इतरांनी आपले वाढदिवस साजरे केले नाहीत का? मग यालाच विरोध का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.  
आमदार म्हणतात,
भोजनावळ जनतेच्या प्रेमाखातर!
यासंदर्भात कांबळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आपण दरवर्षी वाढदिवस साजरा करतो. गेल्या वर्षी निवडणुकांमुळे तो मोठय़ा प्रमाणात साजरा केला नाही. पण दरवर्षी विभागातील मंडळींना आपण वाढदिवसानिमित्त जेवण देतो. त्यात वेगळे काही नाही. विभागातील अनेक कामांसाठी आपल्या निधीचा वापर झाला आहेच. पण तब्बल साडेचार कोटी रुपयांची अतिरिक्त कामे केल्याने आपण सध्या कर्जात आहोत. भोजनावळ ही जनतेच्या प्रेमाखातर आहे.