विधान परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे लक्ष्य; मतांची फाटाफूट होण्याचे संकेत
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोनपैकी एका उमेदवाराला अडचणीत आणण्याची भाजपची खेळी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डावपेचामुळे राष्ट्रवादीचे नेते सावध झाले आहेत. या निवडणुकीत मतांची फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी १२ जणांचे अर्ज दाखल झाल्याने प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मते नसताना सहा उमेदवार रिंगणात उतरविले असून, एका अपक्षाला पुरस्कृत केले आहे. सातपैकी एकाचा अर्ज मागे घेऊन सहा जणांना रिंगणात ठेवले जाणार आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यास राष्ट्रवादी किंवा भाजपचा एक उमेदवार अडचणीत येऊ शकतो. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव करणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे.
सभापती रामराजे नाईक-िनबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आहेत. यापैकी धनंजय मुंडे हे भाजपचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात येते. विधान परिषदेत मुंडे हे सरकारवर जोरदार हल्ला चढवितात.
तसेच पंकजा मुंडे यांना परळीमध्ये त्यांनी जेरीस आणले आहे. राष्ट्रवादीला दोन जागांवर पाठिंबा दिल्याने काँग्रेसमध्ये विरोधी सूर आहे. आमदारांच्या या नाराजीचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याशिवाय मतांचा कोटा अशा पद्धतीने वाटला जाईल की सहावा उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी भाजपची व्यूहरचना आहे.

मतांच्या जुळवाजुळवीवर भर
निवडणूक झाल्यास दुसरा उमेदवार अडचणीत येऊ शकतो, हे लक्षात आल्याने राष्ट्रवादीने मतांच्या जुळवाजुळवीवर भर दिला आहे. काँग्रेसच्या काही आमदारांचा पाठिंबा घेण्याबरोबरच शिवसेनेची अतिरिक्त किंवा दुसऱ्या पसंतीची मते भाजपकडे जाणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार पाडण्याची भाजपची योजना असली तरी आपल्या दिल्लीतील संबंधांचा वापर करून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करू शकतात. काँग्रेसचे ४२ आमदार असून, राणे यांना पहिल्या पसंतीची ३० तर उर्वरित १२ मते राष्ट्रवादीला दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसची काही मते फोडण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी आहे.