मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचा कार्यक्र्म पार पडणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे नक्की जातील असं सांगितलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी ट्विट करत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं असं आवाहन उद्धव ठाकरेंना केलं आहे.

उद्धव ठाकरे भूमिपूजनासाठी अयोध्येत जाणार का? संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

माजिद मेमन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण देण्यात आलेल्यांमध्ये उद्धव ठाकरेंचाही समावेश आहे. करोनाच्या नियमांचं पालन करत उद्धव ठाकरे सहभागी होऊ शकतात. पण धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी अशा धार्मिक कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्यापासून दूर राहावं”

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार असून सध्या संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार की नाही हे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला -संजय राऊत

“अयोध्येला उद्धव ठाकरे नक्की जातील. शिवसेनेचं या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं जोडलेलं आहे. आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर कऱण्यासाठी शिवसेनेनं मोठं योगदान दिलं आहे, रक्त सांडलं आहे. मी काल सांगितलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजेच सरकारचे १०० दिवस झाल्यावरही गेले होते,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.