पश्चिम महाराष्ट्रातील अपयश धुऊन काढण्याचा हेतू

लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी केलेली नियुक्ती ही निवडणुकीच्या तोंडावर मराठा कार्ड खेळण्याच्या राष्ट्रवादीच्या परंपरेचा भाग असल्याचे मानले जाते. गेल्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील अपयश धुऊन काढत पुन्हा यश मिळवण्याचा हेतू पाटील यांच्या नेमणुकीमागे आहे.

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर याबरोबरच अहमदनगर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. अहमदनगर महसुलीदृष्टय़ा उत्तर महाराष्ट्रात गणला जात असला तरी राजकीयदृष्टय़ा तो पश्चिम महाराष्ट्राला जवळचा मानला जातो. या सहा जिल्ह्य़ांमधील विधानसभेच्या ७० जागांपैकी अवघ्या १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला २०१४ मध्ये जिंकता आल्या होत्या. आपल्या हक्काच्या भागातच पक्षाला फटका बसला. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या पुणे जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची धूळधाण झाली होती. मोदी लाटेचा तो परिणाम होता. ओबीसी समाजातील सुनील तटकरे त्या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना जून २०१४ मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. त्यानंतर तटकरे हे मागील आठवडय़ापर्यंत प्रदेशाध्यक्ष होते.

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका-नगरपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादीची पीछेहाटच होत गेली. मराठा मोर्चाचे यशही पक्षाला वाचवू शकले नव्हते. मराठा जनमानस फडणवीस सरकारवर नाराज असले तरी पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांची नस पकडेल, त्यांना जवळचा वाटेल, त्यांची मते आपल्याकडे वळवू शकेल, असे नेतृत्व राष्ट्रवादीकडे नसल्याची चर्चा होती. या पाश्र्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने माजी अर्थमंत्री, ग्रामविकासमंत्री, सहकाराच्या राजकारणातील जाणकार अशी ओळख असलेल्या जयंत पाटील यांच्या रूपाने पुन्हा एकदा मराठा नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याची हुकमी चाल खेळली आहे.

२००४ मध्ये तत्कालीन सरकारच्या बाजूने फारसे चांगले वातावरण नसताना तत्कालीन ग्रामविकासमंत्री असलेल्या दिवंगत आर. आर. पाटील यांना प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले. त्याचा योग्य तो संदेश गेला. त्यांनी मराठा समाजाला आश्वासक वाटेल अशारीतीने प्रचाराचा असा काही धडाका लावला की राष्ट्रवादीला २००४ मध्ये विक्रमी ७१ आमदार निवडून आणता आले. त्याचे बक्षीस म्हणून सरकार आल्यावर आर. आर. पाटील यांची उपमुख्यमंत्रीपदी बढती झाली. २००९ मधील निवडणुकीच्या आधीही आर. आर. पाटील यांना प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला पुन्हा चांगले यश मिळाले होते. याच अनुभवांच्या आधारे निवडणुका वर्षभरावर असताना जयंत पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

सांगलीचे जयंत पाटील यांना संधी दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर अपेक्षित परिणाम होऊन निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा राष्ट्रवादीचा होरा आहे. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाडय़ातही पाटील यांचा उपयोग पक्षाला होईल. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत विदर्भात हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र राष्ट्रवादीला अनुकूल असलेल्या आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मराठवाडय़ात चांगला प्रतिसाद मिळाला आणि राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढला. आता पश्चिम महाराष्ट्रातही हल्लाबोल यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.