ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई करण्यात आल्यानंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचा जावई अडचणीत आला आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून (NCB) समीर खान यांना समन्स बजावण्यात आलं असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.
एनसीबीने वांद्रे येथून ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असं एनसीबीचं म्हणणं आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.
मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई
तपासादरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाला असल्याचं समोर आलं. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे. समीर खान यांना यासाठीच समन्स बजावण्यात आलं असून चौकशी केली जाणार आहे.
जयशंकर तिवारी यांना ‘मुच्छड पानवाला’ नावाने ओळखलं जातं. अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रेटी तसंच क्रिकेटर मुच्छड पानवाल्याचे ग्राहक आहेत. ड्रग्ज प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानीच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत मुच्छड पानवाल्याचं नाव समोर आलं होतं. खारमध्ये राहणारा हा ब्रिटीश नागरिक आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.
जयशंकर तिवारी यांना ‘मुच्छड पानवाला’ नावाने ओळखलं जातं. अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रेटी तसंच क्रिकेटर मुच्छड पानवाल्याचे ग्राहक आहेत. मुंबई आणि देशातील प्रसिद्ध पानवाल्यांपैकी तो एक आहे. १९७० पासून केम्स कॉर्नर परिसरात मुच्छड पानवाल्याचं दुकान असून दरवर्षी त्याच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मुच्छड पानवाला महागड्या मर्सिडीज कारमधून फिरतो. विशेष म्हणजे २०१६ मध्ये त्याने ग्राहकांकडून ऑनलाइन ऑर्डर घेण्यासाठी वेबसाईटदेखील सुरु केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 12:09 pm