धवल कुलकर्णी

करोनाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मुंबईतल्या अन्य ठिकाणी स्थलांतरित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. एवढंच नाही तर या पत्रात कोकणातली बरीच मंडळी जी लॉकडाउनमध्ये अडकून पडली होती त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना घरी पाठवण्यात यावं अशीही मागणी केली होती. कारण हे लोक ज्या खोल्यांमध्ये आणि वस्त्यांमध्ये राहतात तिथे करोना टाळण्यासाठी उपाय योजणं तेवढंसं सोयीचं नाही हेदेखील निकम यांनी म्हटलं आहे.

परंतु राज्य शासनाने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातल्यामुळे सध्या या चाकरमान्यांना निदान लॉकडाउन संपेपर्यंत मुंबईमध्येच राहावे लागेल हे स्पष्ट केलं आहे. कोकणातील बरीच लोक मुंबईमध्ये कामानिमित्त येतात. मार्च एप्रिल महिन्यामध्ये बरेच लोक मुंबईला लग्न किंवा इतर कार्यासाठी मंडप घालण्याच्या कामासाठी वास्तव्य करतात. मात्र या कुणालाही बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

मुंबई हे एक अवाढव्य पसरलेलं महानगर ज्याच्यामध्ये साधारणपणे ६० ते ७० टक्के लोक झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये वास्तव्य करतात. त्यांच्या घरांमध्ये ना धड खेळती हवा असते, ना ऊन. बहुतांश ठिकाणी बाथरुमही घराबाहेरच असतं.  कष्टकऱ्यांच्या या वस्त्यांमध्ये एकूणच वातावरणामुळे टी.बी.सारख्या रोगाचा प्रादुर्भाव असतो. ही एकंदर आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता करोना सारख्या भीषण रोगाला मुंबईतल्या या वस्त्या बळी पडू शकतात अशी एक अत्यंत रास्त भीती आहे. हेच सगळं लक्षात घेऊन हे पत्र निकम यांनी लिहिलं होतं.

दर अर्ध्या तासाने स्वच्छ हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा हा सल्ला कदाचित इथे राहणाऱ्या मंडळींना न पटणाराही वाटू शकतो. कारण एका दहा बाय दहाच्या खोलीत माणसं शिफ्टमध्ये झोपतात. जिथे टॉयलेट बाथरूमला आणि स्वयंपाकालाही धड पाणी मिळत नाही तिथे या गोष्टी करणं नुसत्या अवघडच नाहीत तर महाकठीण आहेत.

दरम्यान निकम यांनी असे म्हटले आहे की चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये सोय नसल्यामुळे एक तर तिथे तिथे या सोयी उपलब्ध कराव्यात किंवा या सोयी जिथे आहेत तिथे या सगळ्यांना न्यावं. जसे की रिकाम्या शाळा, कॉलेज किंवा क्लब अश्या जवळच्या ठिकाणी करावी असंही निकम यांनी स्पष्ट केलं आहे.

“कधीकधी एका छोट्याशा खोलीत दहा-दहा जण राहतात. यांना शिफ्टमध्ये झोपावे लागते आणि त्यामुळे समजा इथे एखादा आजार आला तर तो झपाट्याने पसरण्याचा धोका आहे,” असे निकम यांनी सांगितले.