दादर स्थानकात टॅक्सी चालकांच्या मुजोरपणाचा सर्वसामान्यांना नेहमीच अनुभव येत असतो. असाच काहीसा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आला आहे. ट्रेनमध्ये घुसखोरी करत टॅक्सी चालकाने आपली वाट अडवत नाहक त्रास दिल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर यासंबंधी माहिती दिली असून रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “दादर स्थानकावर मला एक अजब अनुभव आला. कुलजित सिंह मल्होत्रा नावाची एक व्यक्ती अचानक ट्रेनमध्ये घुसली आणि टॅक्सी हवी आहे का विचारत ओरडू लागली. दोनवेळा नकार देऊनही त्याने माझा रस्ता अडवला आणि नाहक त्रास दिला. यानंतरही निर्लज्जपणे तो फोटो काढण्यासाठी पोझ देत होता”.

पुढच्या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार करत सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे की, “कृपया या प्रकरणात लक्ष घालावं, जेणेकरुन इतर प्रवाशांना अशा परिस्थितीतून सामोरं जावं लागणार नाही. जर दलाली करण्याला कायद्याने परवानगी असेल तर रेल्वे स्थानकं आणि विमानतळांवर त्याची परवानगी नसावी. फक्त अधिकृत टॅक्सी स्टॅण्डवरच परवानगी असावी”.

दादर स्थानकावरील रेल्वे अधिकारी आणि पोलिसांकडे यांसबंधी तक्रार केली असता कारवाई करत दंड ठोठावण्यात आल्याचं आरपीएफकडून सांगण्यात आलं आहे अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी कारवाई केल्याबद्दल आरपीएफचे आभार मानले आहेत.