संदीप आचार्य

महाराष्ट्रात, मुंबईत करोना का वाढतो?… तुम्हाला नियंत्रणात का आणता येत नाही?… अशा प्रश्नांच्या सरबत्तीसह दिल्लीतील वरिष्ठ सनदी अधिकारी वेळोवेळी महाराष्ट्रातील त्रुटींवर बोट ठेवत होते. आज महाराष्ट्र व मुंबईने करोना नियंत्रणात आणण्याचे नियोजनबद्ध काम चालवले असताना दिल्ली करोनाने पेटली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच डझनभर सनदी अधिकाऱ्यांसह २८ हजाराहून अधिक लोक करोना बाधित का झाले याचे उत्तर कोण देणार? असा सवाल राज्यातील एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर केला तर करोना सनदी अधिकारी, श्रीमंत वा गरीब असा भेदभाव करत नसतो असे सांगून दिल्लीने आता करोना नियंत्रणात कसा आणायचा ते महाराष्ट्राकडून शिकावे, असा जेरदार टोला आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

केवळ दिल्लीतच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगडसह अनेक राज्यात करोनाने उग्र रुप धारण केले आहे. दिल्लीतील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा १२ ते १६ तास पुरेल एवढाच असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीमधून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पथके वेळोवेळी महाराष्ट्रात येत होती व महाराष्ट्राला करोना नियंत्रणात का आणता येत नाही? असे सवाल केले जात होते. यावरून केंद्रातील मंत्री व राज्य सरकार यांच्यातही जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते. महाराष्ट्राला पुरेशा लसी केंद्राकडून दिल्या जात नाहीत तसेच ऑक्सिजन पुरवठ्यासह अनेक मुद्दे राज्यातील मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून उपस्थित केले जात होते. तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसह केंद्रातील भाजप नेत्यांकडून लसीकरण योग्य होत नसल्यासह अनेक मुद्द्यांवर टीका होत होती.

पंतप्रधान शेवटचा पर्याय म्हणाले, तरी महाराष्ट्राला लॉकडाउनची गरज -राजेश टोपे

महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत परिस्थिती स्फोटक

या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील एक डझनहून अधिक सनदी अधिकारी व २८ हजार नागरिक करोना बाधित कसे झाले याचे उत्तर मिळेल का? अशी विचारणा राज्यातील एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्राने करोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रकारे मेहनत घेतली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार यासह अनेक योजना राबविल्या. करोनाची दुसरी लाट येणार हे लक्षात येताच राज्यातील आरोग्य व्यवस्था पुन्हा मजबूत केली. राज्यातील खाटांची संख्या वाढवली. ऑक्सिजन खाटा ६२,४०५ केल्या तर आयसीयू खाटा २०५१९ केल्या आहेत. ९४३७ व्हेंटिलेटर खाटांची व्यवस्था केली. ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन व्यवस्था करण्याचे सतत प्रयत्न सुरु आहेत. मुंबईतही १२ हजारांवरून २१ हजार बेडची व्यवस्था तातडीने करण्यात आली तसेच ६००० हजार खाटांची तीन नवीन जम्बो रुग्णालये येत्या काही दिवसांत मुंबईत उभी राहाणार आहेत. दिल्लीत दोन दिवसांपूर्वी २३ हजार रुग्ण होते तर २४० जणांचा मृत्यू झाला. ते वाढून काल २८,९९५ रुग्ण झाले असून २७७ लोकांचा मृत्यू झाला. रुग्णवाढीचा दर हा २६.१२ टक्क्यांवरून वाढून तो ३२.८२ टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्रापेक्षा दिल्लीतील परिस्थिती आज स्फोटक झाली असून बेडसाठी तसेच ऑक्सिजनसाठी आज राजधानीत धावाधाव करावी लागत आहे.

“मला प्रियांका गांधींना विचारायचं आहे की त्यांनी…”, देवेंद्र फडणवीसांचा थेट गांधी कुटुंबावर निशाणा!

मुंबईत आठवड्याभरात रुग्णसंख्या कमी

महाराष्ट्रात मुंबईसह अनेक शहरातील लोकसंख्येची घनता तसेच बाहेरच्या राज्यातून उपजीविकेसाठी सातत्याने येणारा वर्ग तसेच अन्य काही कारणांनी करोना वाढला हे मान्य केले तरी राज्यातील करोना ६० हजार रुग्णांच्या आगेमागे नियंत्रणात ठेवला आहे. मुंबईत ११ हजारावर असलेली रुग्णसंख्या आता सात हजारापर्यंत कमी झाली आहे. मुंबईविषयी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना विचारले असता गेल्या सहा दिवसांत रुग्णसंख्या स्थिर असून मृत्यू दराचे प्रमाण गेल्या ७० दिवसांत ०.०३ एवढे राहिल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या गुरुवारी मुंबईत ८२१७ करोना रुग्ण होते ते काल मंगळवारी कमी होऊन ७२१४ एवढे झाले आहेत. करोना नियमांची मुंबईत सातत्याने कठोर अंमलबजावणी करत आहोत. मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. करोना नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.

“पायाखाली काय जळतंय, हे केंद्रानं पाहावं”

याच्या उलट परिस्थिती दिल्लीत होती. बहुसंख्य लोक करोना संपला असे मानून मास्क वापरत नव्हते. करोनाच्या कोणत्याच नियमांचे पालनही होत नव्हते. एवढेच नव्हे तर स्विमिंग पूलही खुले होते. पंतप्रधान अनेक राज्यात निवडणूक सभांचा धुरळा उडवत फिरणार आणि लॉकडाउन हा अंतिम पर्याय असल्याचे राज्यांना सांगणार. उत्तर प्रदेशमध्ये उच्च न्यायालयानेच लॉकडाउन जाहीर केले. काही राज्यात आता लॉकडाउन जाहीर झाले तर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाची परिस्थिती चिंताजनक बनल्याचे सांगून नवाब मलिक यांनी दिल्लीची जबाबदारी आता कोण घेणार? असा सवाल केला. खरंतर देशभरात लसीकरण मोहीम जोरात राबवायला हवी. २५ वर्षांपुढील सर्वांना लस द्या असे सातत्याने महाराष्ट्र सांगत होता आता पंतप्रधानांनी १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. करोना नियंत्रणावरून आता तरी दिल्लीने महाराष्ट्रावर टीका करू नये असे सांगून आपल्या पायाखाली काय जळते आहे ते केंद्राने आता पाहाण्याची गरज आहे. करोना नियंत्रणात आणायचा असेल तर महाराष्ट्राकडू नक्कीच शिकण्यासारखे आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.