राहुल गांधी यांच्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठ

नगरपालिका निवडणूक निकालानंतर आघाडीच्या आवश्यकतेबाबत दोन्ही काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा सूर आळवू लागला असला तरी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुढाकाराने मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीपासून दूर राहून राष्ट्रवादीने काँग्रेसपासून अंतर कायम ठेवले आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीने भविष्यात एकत्र आले पाहिजे, अशी दोन्ही पक्षातील नेत्यांची भावना झाली. पालिका निवडणुकांमध्ये भाजप आघाडीवर असला तरी दोन्ही काँग्रेसचे संख्याबळ एकत्र केल्यास ते भाजपपेक्षा जास्त होते. भाजप-शिवसेना युतीला धक्का देण्याकरिता दोन्ही काँग्रेसने एकत्र यावे, अशी चर्चा सुरू झाली. आघाडी करण्यास आमची तयारी आहे, पण सारे राष्ट्रवादीवर अवलंबून आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे म्हणणे आहे.

तर काँग्रेसच्या नेतृत्वाने ताठर भूमिका सोडावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. नगरपालिका निकालांच्या आधारे आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये शक्य असेल तेथे आघाडी व्हावी, असे प्रयत्न सुरू झाले आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा कल असला तरी दिल्लीच्या पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सूर जुळू शकलेले नाहीत. निश्चलनीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले नव्हते. समाजवादी पार्टी, डावे पक्षही दूर राहिले.

राहुल गांधी यांच्याबद्दल राष्ट्रवादीची नाराजी लपून राहिलेली नाही. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेहमीच शरद पवार यांचा सन्मान राखला. पवारांच्या कलाने सरकारमध्ये निर्णय घेतले. राहुल गांधी मात्र राष्ट्रवादीला तेवढी किंमत देत नाहीत. अलीकडेच विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जादा जागांची मागणी केली असता ती मागणी मान्य न करता राहुल यांनी स्वबळावर लढण्याची सूचना राज्यातील नेत्यांना केली होती. राष्ट्रवादीच्या भाजपच्या जवळकीबद्दलही काँग्रेसमध्ये वेगळा सूर आहे. मोदी व पवार हे परस्परांवर स्तुतीसुमने उधळतात यावरून राष्ट्रवादीबद्दल संशयाची भावना तयार होते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीला हा आरोप मान्य नाही.

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्यात यावा, असा निर्णय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादीबरोबर राज्य पातळीवर नव्हे तर स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.