अल्पसंख्याक मतदारवर्गाला आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादीने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यापाठोपाठ राज्यसभेसाठी अ‍ॅड. माजिद मेमन यांना उमेदवारी देऊन अल्पसंख्याक समाजास आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादीने ज्येष्ठ वकिल माजिद मेमन यांची उमेदवारी जाहीर केली. पवार आणि मेमन शुक्रवारी दुपारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. दुसऱ्या जागेसाठी पक्षाने मुद्दामच अल्पसंख्याक वर्गातील उमेदवाराला संधी दिली आहे. अ‍ॅड. मेमन यांना २०१२ मध्येच उमेदवारी देण्याची पवार यांची योजना होती. पण तेव्हा शक्य न झाल्याने आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. निष्णात फौजदारी वकील असलेल्या अ‍ॅड. मेमन यांच्यावर ‘पोटा’ आणि ‘मोक्का’ खटल्यांमध्ये आरोपींचे वकीलपत्र घेतल्यामुळे जुलै २००५ मध्ये रवि पुजारी टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता. तेव्हा सुदैवाने ते बचावले होते.
राष्ट्रवादीने अनेकदा प्रयत्न करूनही अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा मिळवणे शक्य झालेले नाही. आगामी निवडणुकीत या वर्गाची मते मिळविण्याच्या उद्देशानेच मराठाबरोबरच मुस्लिमांना नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याची टूम राष्ट्रवादीने काढली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाने निर्णय घ्यावा, अशा सूचना शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत. अ‍ॅड. मेमन यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला उमेदवारीत प्रतिनिधीत्व दिले जाणार नाही. गेल्या वेळी मावळमधून पक्षाने आझम पानसरे यांना उमेदवारी दिली होती. पण सहाही विधानसभा मतदारसंघात पानसरे हे मागे पडले होते. हे लक्षात घेऊन पवार यांनी अल्पसंख्याक समाजातील नेत्याला राज्यसभेवर धाडले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीची ३६ मते आवश्यक आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या ६२ असली तरी १२ अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेता दुसरी जागा निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

ठेकेदार संजय काकडे रिंगणात
पुण्यातील बडे ठेकेदार संजय काकडे हे सातव्या जागेसाठी पुरेशा ‘तयारी’ने रिंगणात उतरणार आहेत. अपक्ष आणि छोटय़ा पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेनेने त्यांची अतिरिक्त मते द्यावीत म्हणूनही काकडे प्रयत्नशील आहेत.