News Flash

राष्ट्रवादीने प्रतिमा जपली!

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीची मोट बांधण्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

|| संतोष प्रधान

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाची भूमिका बजावीत असतानाच, अहमदनगर महापौर निवडणुकीत भाजपला मदत केल्याने पक्षाच्या विश्वासाहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सर्व नगरसेवकांची हकालपट्टी करून राष्ट्रवादीने भाजपच्या जवळ जात असल्याचे चित्र पुसण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीची मोट बांधण्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपच्या धोरणांवर टीकाटिप्पणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जाते. काँग्रेसबरोबर आघाडी करून राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असतानाच, नगरमध्ये महापौर निवडणुकीत भाजपला मदत केल्याने राष्ट्रवादीबद्दल वेगळे मत व्यक्त केले जाऊ लागले. राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांच्या इशाऱ्यावरूनच ही युती झाल्याची चर्चा सुरू झाली. भाजपबरोबर हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीच्या विश्वासाहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यातून सुटका करण्यासाठीच राष्ट्रवादीने नगरच्या जिल्हाध्यक्षांना पदावरून दूर केले. तसेच १८ नगरेसवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. अर्थात, या युतीची जबाबदारी घेणारे स्थानिक आमदार संग्राम जगपात यांच्या विरोधात पक्षाने काहीच कारवाई केलेली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मदत केल्याने राष्ट्रवादीची कोंडी झाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापण्यासाठी भाजपला मदत करण्याची पक्षाची तयारी किंवा वेळोवेळी भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीला त्याचा फटका बसला होता. पक्षाच्या काही नेत्यांनी नेतृत्वाकडे नापसंती व्यक्त केली होती. नगरमध्ये राष्ट्रवादीने भाजपशी केलेली हातमिळवणी ही उचित नव्हती, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती. यावरून काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या पवित्र्याबद्दल संशयाचे वातावरण तयार केले होते.

भाजपशी हातमिळवणी केली हा संदेश राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत महागात पडला असता. यामुळेच राष्ट्रवादीने नगरसेवकांच्या विरोधात कारवाई करून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. नगरसेवकांना बडतर्फ करण्यात आले असले तरी नगरमध्ये संख्याबळ नसतानाही राष्ट्रवादीच्या मदतीने महापौर निवडून आणण्याची भाजपची खेळी यशस्वी झाली. राष्ट्रवादीची मदत घेतल्याबद्दल भाजपचे तेवढे नुकसान होत नाही तेवढे नुकसान भाजपला मदत केल्याने राष्ट्रवादीचे होते.

पक्षाने भाजपला मदत करण्याचा कोणताही आदेश दिला नव्हता. उलट काँग्रेसबरोबर राहण्यास सांगण्यात आले होते. पक्षादेशाचा भंग केल्यानेच सर्व नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादी विरोधकाची भूमिका बजावीत असून, भाजप-शिवसेनेपासून अंतर राखूनच आहे.   – आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:41 am

Web Title: ncp politics in maharashtra 2
Next Stories
1 आर्थिक दुर्बल आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी
2 शालान्त परीक्षोत्तर शिष्यवृत्तीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ
3 बेस्टनंतर आता ओला-उबरचाही संपाचा इशारा
Just Now!
X