22 July 2019

News Flash

‘मसुद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात चीनचा खोडा, 56 इंच छाती फुगवणारे मोदी काय करणार?’

राष्ट्रवादी काँग्रेसची व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका

मसुद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात चीनने चौथ्यांदा खोडा घातला आहे. आता 56 इंच छातीचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला आहे. एक व्यंगचित्र पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

काय आहे व्यंगचित्र?
मसुद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात चौथ्यांदा चीनने खोडा घातला. 56 इंच छातीचा फुगा टाचणीने फुटू लागल्यावर आता मोदी सरकार चीनबाबत काय करणार? असा प्रश्न राष्ट्रवादीने पोस्ट केला आहे. तर व्यंगचित्रात नरेंद्र मोदी छप्पन इंच छातीचा फुगा फुगवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या फुग्याला एक हात टाचणी लावतो आहे ज्यावर चीन लिहिलं आहे. ही पोस्ट भाजपाला झोंबणारी अशीच आहे. यावर भाजपा काय उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुलवामा हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या हल्ल्यामागे मसुद अझहर म्होरक्या असलेली जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना आहे. या हल्ल्यानंतर मसुद अझहरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यात यावे अशी मागणी होत होती. मात्र चीनने खोडा घातल्याने हे शक्य झाले नाही. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

First Published on March 15, 2019 7:22 pm

Web Title: ncp post cartoon against modi government