मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणांनी आज मुंबई दणाणली. भाजपा सरकार विरोधी घोषणा देत मुंबईमध्ये राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. यामध्ये ‘गरीबांची चेष्टा बंद करा…पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा’ ,’या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय’, ‘मोदी सरकार हाय-हाय मोदी सरकार हाय-हाय’…’पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईमध्ये सरकारच्याविरोधात मुंबईमधील पेट्रोल पंपामध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना काळे कमळ देवून सरकारचा निषेध करण्यात आला आणि हे कमळ देवून दरवाढ करणाऱ्या अशा सरकारला निवडून दिल्याची आठवण करुन देण्यात आली. हे कमळचं काळं फूल भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली.
या आंदोलनामध्ये मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष बबनराव कनावजे, उत्तर-मध्य जिल्हाध्यक्ष अब्बास कॉन्ट्रक्टर, दक्षिण-मध्य जिल्हाध्यक्ष रमेश परब, मुंबई प्रशासन सुधाकर वड्डे, माजी नगरसेविका रत्ना महाले, वरळी तालुकाध्यक्ष रवी मयेकर, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 5:26 pm