News Flash

पवार-शहा भेटीच्या वृताने तर्कवितर्कांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या भेटीचे  खंडन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र भेटीचे खंडन

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी रात्री अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याचे वृत्त एका गुजराती दैनिकाने दिल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्काला उधान आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या भेटीचे  खंडन केले आहे.

गुजरातमधील एका प्रादशिक दैनिकाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवार यांची भेट अहमदाबादमध्ये झाल्याचे वृत्त दिले आहे.शरद पवार हे राजस्थानमधील जयपूरमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. ते एकदिवसाआधी खासगी विमानाने अहमदाबादला आले होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह एका उद्योगपतीच्या विश्राम गृहावर ही भेट झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.  शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबाद येथून एकत्र आले होते. पण, ते कुणालाही भेटले नाही. गुजरातच्या दैनिकाने हे खोडसाळ वृत्त दिले आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. ही बातमी निव्वळ अफवा आहे. मात्र भाजप नेते अमित शहा यांनी ‘सर्व काही सार्वजनिक करता येऊ शकत नाही’, अशी सूचक प्रतिक्रिया दिल्याने या भेटीबाबत गुढ अधिक वाढले आहे.

२०१४ नंतर अनेकदा पवार-मोदी यांच्यात भेटी झाल्या आहेत. या दोन नेत्यांमध्ये जसे व्यक्तिगत संबंध आहेत तसे शहा-पवार यांच्यात नाही, पवार यांनी अनेकदा शहा यांच्या कार्यशैलीवर जाहीरपणे टीका केली आहे. हे लक्षात घेतले तर पवार-शहा यांना भेटले असतील तर त्याला अधिक महत्त्व आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सध्या राज्यात अस्थिर राजकीय स्थिती आहे. माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आर्थिक देवाण-घेवाणीचे आरोप, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक असलेली गाडी सापडणे, या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू होणे आणि या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांचा सहभाग उघड होणे या एकूणच घटनाक्रमांनी राज्य सरकार हादरले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. या  प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए करत आहे. दुसरीकडे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारने भाजपची  कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 1:53 am

Web Title: ncp sharad pawar bjp leader amit shah akp 94
Next Stories
1 बॉम्बे बार असोसिएशनने केली आभासी पध्दतीने न्यायालयीन सुनावणीची मागणी
2 ‘एनआयए’चं मिठी नदी पात्रात सर्च ऑपरेशन; लॅपटॉप, सीपीयू, प्रिंटर, नंबर प्लेट्स मिळाल्या
3 “… मग कारवाई करण्यापासून मुख्यमंत्र्यांना कुणी रोखलं आहे?”
Just Now!
X