मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेकडून कंगनाच्या कार्यालयात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. भाजपा नेते राम कदम, प्रवीण दरेकर यांनी सूड भावनेने कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवारांनी म्हटलं आहे की, “कंगनाचं कार्यालय अधिकृत की अनधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल”.

दरम्यान कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये”.

कंगनाच्या PoK वक्तव्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम हातोडा चालवला. महापालिकेच्या कारवाईवर कंगनाने संताप व्यक्त करत पुन्हा एकदा मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला आहे. तसंच पालिका कर्मचारी आणि पोलिसांचा उल्लेख बाबरची सेना असा केला.

महापालिकेकडून कंगनाला जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती. पण कंगनाकडून कोणतंही उत्तर न दिल्याने आज सकाळी पालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेकडून कारवाईसाठी बुलडोझरचाही वापर करण्यात आला.

पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट केले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही तिने म्हटलं आहे. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली असून उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. न्यायालयाने पालिकेकडे उत्तरही मागितलं आहे.