मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुधवारी पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मंत्रालय परिसरातही रस्त्यांवर पाणी साचलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रालय परिसरात साचलेलं पाणी पाहून आश्चर्य व्यक्त करत आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरमधून घरी जात असताना सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्ह केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील त्यांच्यासोबत गाडीमध्ये होते. लाइव्ह सुरु असताना सुप्रिया सुळे इतक्या पावसात या परिसरात पाणी भरलेलं आजपर्यंत पाहिलेलं नाही असं सांगत असून त्यावर शरद पवार पहिल्यांदाच आयुष्यात पाहतोय असं सांगत आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर सुप्रिया सुळे समुद्रात आल्यासारखंच वाटत आहे असं म्हणत आहेत.

मुंबईत मुसळ’धार’; मोडला ४६ वर्षांचा विक्रम
मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस मंगळवारीही अधूनमधून विश्रांती घेत हजेरी लावत होता. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि मुंबई, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. तर अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचं पाहायला मिळालं.

कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कुलाबा परिसरात १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २६२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर बुधवारी या ठिकाणी २९३.८ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, एकूण परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला.