20 January 2020

News Flash

“शरद पवार जाणता राजा होते…आहेत आणि राहणारच”, मुंबईत झळकलं पोस्टर

उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर देत मुंबईत समर्थकांकडून पोस्टर झळकावण्यात आलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन नाराजी व्यक्त करताना भाजपा नेते आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावरही आक्षेप घेत उदयनराजे यांनी जोरदार टीका केली. दरम्यान उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर देत मुंबईत समर्थकांकडून पोस्टर झळकावण्यात आलं आहे. या पोस्टरवर शरद पवार जाणता राजा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये हे पोस्टर लावण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी हे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे की, “आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा, पण ज्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो त्या नेतृत्त्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून शिंतोडे उडवू नका. शरद पवार साहेब आम्हा तरुणांचे कालही जाणता राजा होते, आजही जाणता राजा आहेत आणि भविष्यातही जाणता राजा राहणारच”.

उदयनराजे नेमकं काय म्हणाले ?
“शिवाजी महाराजांसारखा एखादाच युगपुरुष जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असं उदयनराजे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

First Published on January 15, 2020 12:21 pm

Web Title: ncp sharad pawar posters janta raja bjp udyanraje bhosle chhatrapati shivaji maharaj sgy 87
Next Stories
1 ‘केजी’पासूनच ‘लुटारंभ’
2 अन्य महानगरांपेक्षा मुंबई सुरक्षित!
3 लोकलमध्ये ‘एसी’चे तीनच डबे?
Just Now!
X