शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात राज्यभर राष्ट्रावादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी . ‘ईडी की दादागिरी नही चलेगी’, ‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’ अशी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज करत काहीजणांना ताब्यात घेतलं.

पुण्यातही कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला
याच आंदोलनाचे पडसाद पुण्यात देखील उमटले असून महात्मा फुले मंडई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदवला. रास्ता रोको करणार्‍या कार्यकर्त्यांना महात्मा फुले मंडई पोलिस चौकीत ताब्यात घेतले असता, पोलीस चौकीतील गॅलरीमधून आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बारामती बंद 
कारवाईच्या निषेधार्थ आज बारामती शहरात बंद पाळण्यात येत आहे. विविध सामाजिक संघटनांनी बारामती बंदचे आवाहन केले आहे. तर पुण्यातही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने सुरू आहेत. पवारांवर गुन्हा दाखल झाल्याचं समजल्यानंतर कालच बारामतीकरांनी बंदची हाक दिली होती. ईडीने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप बारामतीतल्या नागरिकांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय ?
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मागील तीन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.