शरद पवारांचे जिल्हानिहाय दौरे

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा १९८०च्या दशकात समाजवादी काँग्रेस, विदर्भाने शरद पवारांना कधीच फारशी साथ दिली नसली तरी आगामी निवडणुकीत विदर्भात पक्ष संघटना वाढविण्याच्या उद्देशाने स्वत: शरद पवार यांनी जिल्हानिहाय दौरे सुरू केले आहेत. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या आधी यवतमाळ ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढून विदर्भात वातावरणनिर्मिती करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे गेले चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर होते. वर्धा येथे आज झालेल्या मेळाव्यानंतर त्यांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा संपुष्टात आला. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या चार जिल्ह्य़ांना भेटी देऊन शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच पवार हे दुसऱ्या टप्प्यात विदर्भाचा दौरा करणार आहेत. हा राजकीय दौरा नसून, शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्याकरिता दौरा केल्याचे पवारांनी जाहीर केले. १ ते ११ डिसेंबर या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ६२ जागांपैकी फक्त एक आमदार निवडून आला. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर अजित पवार यांनी विदर्भात लक्ष घातले होते. राष्ट्रवादीच्या वाढीसाठी त्यांनी दौरे केले होते. पण त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता. आघाडी सरकारच्या काळात विदर्भाच्या वाटय़ाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात वळविण्यात आल्याच्या भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादी वा पवारांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते.

विदर्भाने पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसला साथ दिली. अगदी १९७७ च्या जनता लाटेतही विदर्भात इंदिरा काँग्रेसला यश मिळाले होते. महाराष्ट्रात काँग्रेसला सत्ता मिळण्यात नेहमीच विदर्भाची साथ महत्त्वाची ठरली. १९९९, २००४ आणि २००९ च्या निवडणुकांमध्येही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळण्यात विदर्भाचा महत्त्वाचा वाटा होता. २०१४ मध्ये विदर्भात भाजपने जोरदार मुसंडी मारली. काँग्रेसची पीछेहाट झाली. विदर्भात संघटना वाढविणे हा शरद पवार यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंत विदर्भाने पवारांना साथ दिली नसली तरी भविष्यात पक्ष वाढविणे हे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रवादीची ताकद वाढल्यास ते काँग्रेसला तापदायक ठरू शकते.