काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये ‘वजनदार’ खात्यांसाठी रस्सीखेच

आपल्या पक्षातील मंत्र्यांना कोणती खाती द्यायची, यावर काँग्रेसमध्ये दिल्लीत सुरू असलेला खल आणि राष्ट्रवादीतील असंतोष, यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन २४ तास उलटले तरीही खातेवाटप होऊ शकले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये ‘वजनदार’ खात्यांसाठी रस्सीखेच सुरू असून, एक-दोन दिवसांत खातेवाटप जाहीर होण्याची  शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ खातेवाटप जाहीर केले जाईल, असे आधी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार होऊन एक दिवस उलटला तरी खातेवाटप जाहीर झालेले नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या असून, मलईदार खात्यांवर प्रत्येकाचा डोळा आहे. तसेच काँग्रेसला अतिरिक्त खाते हवे आहे. या साऱ्या गोंधळात खातेवाटपाचा तिढा सुटू शकला नव्हता. नववर्षदिनी खातेवाटप केले जाईल, अशी शक्यता असली तरी काँग्रेसकडून वेळेत यादी सादर झाल्यासच ते शक्य होईल.

मंत्रिमंडळात समावेश झालेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. पक्षाच्या विचारसरणीशी तडजोड करू नका, असा सल्ला राहुल गांधी यांनी मंत्र्यांना दिला. तसेच आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा आवाज क्षीण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची, याचा पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला. यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या प्रत्येक मंत्र्याशी वैयक्तिकपणे चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची, याचा निर्णय नवी दिल्लीतच होईल. ही यादी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यानंतरच ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, असे समजते.

राष्ट्रवादीत खातेवाटपावरून सारे आलबेल नव्हते. यामागे पक्षातील अंतर्गत राजकारणाची किनार कारणीभूत असल्याचे समजते.

गृह या खात्यावर राष्ट्रवादीतील अनेकांचा डोळा आहे. अनिल देशमुख यांच्याकडे गृहखाते सोपविण्यात येणार असल्याची चर्चा रंगताच पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.  दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिक आदींना खाती बदलून हवी आहेत. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले असले तरी खातेवाटपात त्यांचे पंख कापण्याचे प्रयत्न पक्षातून पद्धतशीरपणे सुरू आहेत. यापैकी काही मंत्र्यांना खाती बदलून दिली जातील, असे समजते.

घोळाची परंपरा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये खातेवाटपाचा असाच घोळ घातला जात असे. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप मध्यरात्री साडेबारानंतर जाहीर करण्यात आले होते. असाच घोळ आता घातला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात सहा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता, पण त्यांचे खातेवाटपही दोन आठवडय़ाने करण्यात आले होते. हाच कित्ता आता गिरवला जात आहे.

खातेबदलावर काँग्रेस ठाम :  ग्रामीण

भागाशी संबंध असलेले सहकार, ग्रामविकास किंवा कृषी यापैकी एक खाते मिळावे या मागणीवर काँग्रेस अजूनही ठाम आहे. अंतिम खातेवाटप जाहीर होण्यापूर्वी खातेवाटपात बदल व्हावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे.