भाजपच्या मंत्र्यांच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे टीकास्त्र

गिरीश बापट मंत्री असले तरी खात्याचा कारभार त्यांचा मुलगा चालवितो हे जपान दौऱ्यात मुलाला बरोबर नेल्याने अधोरेखितच झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी केली. तसेच राज्यातील वनसंपत्ती बाबा रामदेव यांच्या कंपनीला देण्याच्या निर्णयावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘जंगल बुक’मधील ‘मोगली’ची उपमा देण्यात आली आहे.

बापट हे अन्न व नागरीपुरवठा आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री असले तरी या दोन्ही खात्यांमध्ये बापटपुत्रच सर्वेसर्वा असल्याची मंत्रालयात चर्चा असते. बापटपुत्राला ‘भेटल्या’शिवाय कामे होत नाहीत, असेही बोलले जाते. इतके दिवस ही नुसतीच चर्चा होती, पण परदेश दौऱ्यात बापटपुत्र गेल्याने हे अधोरेखितच झाल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. जायको कंपनीच्या वतीने पुण्यात काही प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्या दृष्टीने बापट जपान दौऱ्यावर गेले आहेत. वास्तविक या साऱ्यांशी नगरविकास खात्याचा संबंध आहे. बापट यांचा काहीही संबंध नसताना ते जपान पर्यटनावर गेले आहेत. मुलाला आणि प्रसिद्धीप्रमुख सुनील माने यांना बरोबर नेण्याची गरज काय होती, असा सवालही मलिक यांनी केला. मुलगा आणि प्रसिद्धीप्रमुख स्वखर्चाने जपान दौऱ्यावर गेल्याचा खुलासा अन्न व नागरी पुरवठा विभागाने केला आहे. वडिलांबरोबर शासकीय कामकाज पाहण्यासाठी मुलाने जाण्याची गरज काय होती, असा सवालही मलिक यांनी केला.

‘रामदेव यांना सवलत’

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला राज्यातील वनसंपत्तीचा वापर करण्यास परवानगी देण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्यांचा कधी विचार झाला नाही, रामदेव यांच्या कंपनीला वनसंपत्ती देण्याची गरजच काय, असा सवाल मलिक यांनी केला. रामदेव यांच्या कंपनीच्या फायद्यासाठीच नेल्से कंपनीच्या मॅगीवर बंदी घालण्यात आली होती, असा आरोप करतानाच मलिक यांनी आता याच रामदेव यांना सरकार सारी वनसंपत्ती देत असल्याची टीका त्यांनी केली.