X

‘मुली पळवण्याचा प्रकार घडला तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल करा’

राम कदम जे युवकांना शिकवू पाहात आहेत ते होणार नाही कारण इथला युवक शिवरायांचा मावळा आहे भाजपाचा कार्यकर्ता नाही

महाराष्ट्रात यापुढे मुली पळवण्याचा प्रकार घडला तर पहिला गुन्हा भाजपा आमदार राम कदम यांच्यावर दाखल करा असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. दहीहंडीच्या वेळी राम कदम यांनी मुक्ताफळे उधळली. लग्नासाठी मुलींना पळवून आणेन असे वक्तव्य करणारे राम कदम यांची संस्कृती तरी कोणती आहे? ते कोणत्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत असाही प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. तसेच जे वक्तव्य राम कदम यांनी केले आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशीही मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.राम कदम जो धडा आत्ताच्या युवकांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे पालन महाराष्ट्रात होणार नाही कारण महाराष्ट्रातला युवक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे भाजपाचा कार्यकर्ता नाही असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याच कार्यक्रमात राम कदम बेताल वक्तव्य करतात. मग मुख्यमंत्री याचे समर्थन करत आहेत का? असाही प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.कोणत्याही कामासाठी तुम्ही मला भेटू शकता. साहेब मी तिला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते आहे प्लीज मदत करा, असे म्हटलात तर आधी मी सांगेनतर तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई वडिल म्हटले की साहेब मुलगी आम्हाला पसंत आहे तर तिला पळवून आणेन, तुमचे लग्न लावून देईन त्यासाठी हा घ्या माझा नंबर असे वक्तव्य राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमा दरम्यान केले. त्यांच्या या वक्तव्याबाबत सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यावर त्यांनी खेद व्यक्त केला आहे. मात्र अद्याप माफी मागितलेली नाही.