विधान परिषदेसाठी रणनीती; राष्ट्रवादी विरोधावर राहुल गांधी ठाम
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी पाठिंबा द्यावा ही मागणी राष्ट्रवादीने केली असली तरी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीला झुकते माप देण्यास विरोध आहे. काँग्रेसनेही दोन जागा लढवाव्यात, असा सूर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी लावला. काँग्रेसने मदत करण्यास नकार दिल्यास शिवसेनेकडील अतिरिक्त मते तसेच अपक्षांवर राष्ट्रवादीची मदार राहणार आहे.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांकडून मते जाणून घेतली. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी या वेळी उपस्थित होते. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मुदत संपत असल्याने या दोघांनाही राष्ट्रवादीला निवडून आणायचे आहे. काँग्रेसची १४ मते मिळाल्याशिवाय राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडमून येऊ शकत नाहीत. गेल्या वर्षी तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीने अविश्वासाचा ठराव मंजूर केला होता. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीला गरज आहे म्हणून मदत कशाला करायची, असा युक्तिवाद पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याजवळ बुधवारच्या भेटीत केला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन जागा लढविण्याचा आग्रह धरला असला तरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मात्र एकच जागा लढवावी या मताचे आहेत. राहुल गांधी यांनीही दोन जागा लढवाव्यात, अशी सूचना राज्यातील नेत्यांना केली. राष्ट्रवादीला फार काही महत्त्व देण्यास राहुल यांचा सक्त विरोध आहे.

राज्यसभेसाठी शिंदे ?
राज्यसभेसाठी काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू केला आहे. शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, असे समजते.

राष्ट्रवादीकडून अन्य पर्यायांचा विचार
राष्ट्रवादीचे ४१ आमदार असले तरी छगन भुजबळ आणि रमेश कदम हे दोन आमदार अटकेत आहेत. पंकज भुजबळ यांना मतदान करणे शक्य होईल का, याबाबत साशंकता आहे. ३८ मतांच्या आधारे दोन जागा लढविणे कठीण आहे. कारण पहिल्या पसंतीच्या २७ मतांची विजयाकरिता आवश्यकता आहे. शिवसेनेकडे आठ मते अतिरिक्त असून मनसेकडे एक मत आहे. याशिवाय हितेंद्र ठाकूर यांची तीन तसेच अन्य अपक्षांच्या मदतीने दुसऱ्या जागेचे गणित जुळविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू केले आहेत. राष्ट्रवादीला कोणाचीही मदत घेण्यात काहीच वावडे नाही, अशी मार्मिक प्रतिक्रिया एका नेत्याने व्यक्त केली.