राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयाला भेट देणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता आपण ईडीच्या कार्यालयामध्ये जाण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे म्हटले आहे. पवारांच्या ईडी कार्यालय भेटीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईमधील अनेक ठिकाणांवर जमावबंदी लागू करण्यात आली. पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नये असं गुरुवारी ट्विट करुन सांगितलं होत. असे असतानाही राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच पवारांच्या मुंबईमधील ‘सिल्वर ओक’ येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या समर्थनार्थ मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे, डोक्यावर ‘मी साहेबांसोबत’ असा मजकूर असणाऱ्या गांधी टोप्या घातल्या आहेत.

आज शरद पवार ईडीच्या कार्यलयाला भेट देणार असल्याने सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बॅलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर जमले होते. यावेळीस कार्यकर्त्यांनी पवारांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. ‘अब की बार शरद पवार’, ‘एकच साहेब पवार साहेब’, ‘ईडी झाली येडी’ अशी घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी करत शरद पवारांनी पाठिंबा दर्शवला. तर ‘कोण आला रे कोण आला मोदी शहाचा बाप आला’ अशी घोषणाबाजी करत त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर निशाणा साधला. अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ वेगवेगळे पोस्टर्स आणि बॅनर्सही आणले होते. यामध्ये ‘छत्रपतींचा घेतलाय आशिर्वाद अन् करताय अफझल खानासारखे वार’, ‘महाराष्ट्रासाठी काळा दिवस’, ‘वातावरण फिरलयं, सरकार घाबरलयं’ अशा पद्धतीचा मजकूर छापण्यात आला होता.

दरम्यान, शरद पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता आपण ईडीच्या कार्यालयामध्ये जाण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे म्हटले आहे. आज सकाळपासूनच पवार ईडी कार्यालयाला भेट देण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक टोलनाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात होती. सुरक्षेचा उपाय म्हणून ईडी कार्यालयाभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.