शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन महिने विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त वातावरणनिर्मिती करण्यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील सर्व नेत्यांना पवारांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या समारंभांना निमंत्रण देण्यात आले आहे.
पाच दशकांहून अधिक काळ केंद्र व राज्यात महत्त्वाची भूमिका बजाविलेल्या पवार यांचा वाढदिवस दिल्ली, मुंबई आणि पुण्यात थाटामाटात साजरा केला जाणार आहे. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांमधील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता पवारांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१२ ते १९ डिसेंबर या काळात राज्यात सर्वत्र कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदान शिबीर, विविध क्रीडा स्पर्धा, साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ वर्षांवरील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात १० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले आहे. सर्व नेत्यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केल्याचे तटकरे यांनी सांगितले. या समारंभात पवारांवरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
वाढदिवसाच्या दिवशी १२ तारखेला पवार सकाळी ९ ते दुपारी १ या काळात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात सर्वाना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली आणि मुंबई या दोन्ही कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले.
या समारंभात पवारांच्या जीवनातील सोनेरी क्षणावर आधारित पाच भाषांमधील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. २० तारखेला पुण्यात जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.