शिवसेना आणि भाजपा आणि दोन्ही रंगबदलू आहेत, आता तुमच्या भुलथापांना महाराष्ट्र बळी पडणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीने युतीवर टीका केली आहे. धुळवडीच्या निमित्ताने अमित शाह आणि उद्धव ठाकरे या दोघांचा एक फोटो ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि भाजपावर टीका केली आहे. युतीतल्या दोन्ही पक्षांचे रंग देशाने पाहिले आहेत, आता तुमच्या भुलथापांना महाराष्ट्र बळी पडणार नाही हे नक्की! असं म्हणत राष्ट्रवादीने एक फोटो ट्विट केला आहे.

या फोटोत रंगबदलू शिवसेना असंही म्हटलं गेलं आहे. उद्धव ठाकरे जे आधी म्हणत होते ते ‘काल’ असा मथळा देऊन लिहिण्यात आले आहे. काल असा मथळा देऊन त्याखाली २५ वर्षे युतीत सडली असे उद्धव ठाकरेंचे वाक्य देण्यात आले आहे. तर आज असा मथळा देऊन त्याखाली २५ वर्षे युती घट्ट होती आज जनतेसाठी आम्ही एकत्र आलो असे वाक्य लिहिण्यात आलं आहे.

शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष रंग बदलणारे आहेत असेच राष्ट्रवादी काँग्रेसला यातून सुचवायचं आहे. धुळवडीचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसने हा फोटो ट्विट केला आहे. शिवसेना कशी रंगबदलू आहे ते आणखी एका फोटोत सांगण्यात आलं आहे. काल असा मथळा देऊन मुंबईवर संकट आल्यावर भगवाच कामी आला असं वाक्य लिहिण्यात आलं आहे. तर आज असा मथळा देऊन पूल दुर्घटनेला मुंबईची गर्दी जबाबदार असे लिहिण्यात आले आहे. उद्धव ठाकरे कशी भूमिका बदलतात हेच राष्ट्रवादीला यातून सुचवायचे आहे. आता या फोटोला आणि ट्विटला भाजपाकडून उत्तर दिलं जाणार की नाही हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.