लोकसभा निवडणुकांसाठी सज्ज राहा, असे आदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकीकडे पक्षाच्या चिंतन बैठकांचा धडाका लावला असतानाच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सदस्यपदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या महापालिकांमधून राष्ट्रवादीच्या तब्बल १६ नगरसेवकांची मते फुटली.
ठाणे महापालिकेतून राष्ट्रवादीचे सुहास देसाई जेमतेम ३१ मते मिळवून निवडून आले. मात्र, देसाई यांच्यासाठी राखून ठेवलेली सात मते फुटल्याने ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक म्हणून देसाई ओळखले जातात. पक्षाने देसाई यांच्यासाठी ठाणे महापालिकेतील ३४ आणि नवी मुंबई महापालिकेतील चार असा ३८  नगरसेवकांचा कोटा ठरवून दिला होता. प्रत्यक्षात देसाई यांना ३१ मते मिळाली. त्यामुळे ठाणे महापालिकेतील पक्षाच्या सात नगरसेवकांची मते फुटल्याची तक्रार देसाई यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्याकडे केली आहे. उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादीच्या उमेदवार मिनू दासानी यांनाही या मतफुटीमुळे पराभव पत्करावा लागला. दासानी यांच्यासाठी भिवंडी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे गणित बांधण्यात आले होते. मात्र, तेथील आठ नगरसेवकांची मते फुटल्याचा अंदाज पक्षाच्या वर्तुळातून व्यक्त होतो आहे. या मतफुटीमुळे दासानी यांच्या पारडय़ात जेमतेम २५ मते पडली. दासानी यांच्यासाठी ठरविण्यात आलेली मते कोणत्या पक्षाच्या पारडय़ात पडली याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
एमएमआरडीएच्या २० सदस्यांची निवड मुंबई, ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका तसेच रायगड जिल्ह्य़ातील नगरपालिकांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होत असते. त्यामुळे ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. वसई-विरार पट्टय़ात ६० नगरसेवकांच्या जोरावर दोन उमेदवार उभे करणारे हितेंद्र ठाकूर यांच्या वसई विकास आघाडीला विजयासाठी तब्बल २० मतांची आवश्यकता होती. असे असताना वसई विकास आघाडीचे राजीव पाटील आणि भरत गुप्ता हे दोन्ही उमेदवार चांगली मते मिळवून विजयी झाल्याने राष्ट्रवादीतील फुटलेली मते ठाकुरांच्या मदतीसाठी वळविण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. भिवंडी महापालिकेतील राष्ट्रवादीची फुटीर मते भाजप तसेच ठाकुरांना मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे ठाकुरांच्या मदतीसाठी धावलेला राष्ट्रवादीचा जिल्ह्य़ातील बडा नेता कोण, अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाण्यात शिवसेनेची आघाडी
राष्ट्रवादीला मतफुटीचे ग्रहण लागले असताना ठाणे महापालिका क्षेत्रातून शिवसेनेचे बालाजी काकडे, अनिता गौरी, पूजा वाघ, काशिराम राऊत असे चार सदस्य चांगल्या मताधिक्याने निवडून आले. मुंबई महापालिकेतून शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले आहेत. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातून भाजपने बाजी मारली असून, मीरा-भाइंदर महापालिकेतून राष्ट्रवादीचे लियाकत शेख निवडून आले आहेत. तेथे शिवसेनेचे तीन नगरसेवक मतदानासाठी अनुपस्थित राहिल्याचा फटका पक्षाचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे यांना बसला.