News Flash

राष्ट्रवादी, भाजपमध्ये कायदेशीर मुद्दय़ांवर जुंपली

राष्ट्रवादीने नेता निवडीची शनिवारी केलेली कृती बेकायदा असल्याचा मुद्दा भाजप नेते आशीष शेलार यांनी मांडला

(संग्रहित छायाचित्र)

सत्तासंघर्षांत विविध कायदेशीर मुद्दय़ांवर भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार हेच कायम असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तर जयंत पाटील यांनी नव्या नेता निवडीचे पत्र राज्यपालांना रविवारी सादर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अजित पवार यांची झालेली निवड राष्ट्रवादीने शनिवारी झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत रद्द केली. याऐवजी जयंत पाटील यांच्याकडे विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी सोपविली. अजित पवार यांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून पक्षाच्या सर्व ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना सादर केले होते. यामुळेच जयंत पाटील यांनी रविवारी राजभवनवर जाऊन अजित पवार यांची नेतेपदावरून झालेली उचलबांगडी आणि त्यांचा पक्षादेश काढण्याचा अधिकार काढून घेण्यात आल्याचे पत्र सादर केले. राष्ट्रवादीने विधिमंडळ पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती राज्यपालांना व्हावी म्हणूनच हे पत्र दिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने नेता निवडीची शनिवारी केलेली कृती बेकायदा असल्याचा मुद्दा भाजप नेते आशीष शेलार यांनी मांडला. अजित पवार यांची नियुक्ती पक्षाच्या सर्व आमदारांच्या बैठकीत करण्यात आली होती. शनिवारी झालेल्या बैठकीला सर्व आमदार उपस्थित नव्हते. तसेच अजित पवार हेच राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते असल्याचा दावा शेलार यांनी केला.

कोणत्याही राजकीय पक्षाला कधीही संसदीय किंवा विधिमंडळ पक्षाचा नवीन नेता निवडीचा अधिकार आहे. पक्षाच्या घटनेत तशी तरतूद असते. त्याबाबत राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष यांना नवीन पत्र दिले की नवीन नेत्याची नोंद घेतली जाते, असे विधिमंडळाचे निवृत्त सचिव डॉ. अनंत कळसे यांनी स्पष्ट केले. या तरतुदीनुसार राष्ट्रवादीने आपला नेता बदलला आहे. राष्ट्रवादीने कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील कृती केली.

विश्वासदर्शक ठरावावेळी कसोटी

विधानसभेच्या कामकाजाच्या वेळी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचा नेता कोण, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. विधानसभा अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार निवडून आल्यास अजितदादांचे पत्र ग्राह्य़ मानले जाईल, अशी राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आहे. अशा वेळी त्याला कायदेशीर उत्तर कसे द्यायचे याची तयारी राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. कारण अजितदादांचे पत्र ग्राह्य़ धरल्यास पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मतदान करणारे सदस्य अपात्र ठरणार नाहीत. कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार आम्ही राष्ट्रवादीचेच असा दावा करत आहेत.  विधानसभा अध्यक्षपदाकरिता गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेतले जाते. यात मतांच्या फाटाफुटीस वाव असतो. तसेच कोणी विरोधात मतदान केल्यास ते सिद्ध होत नाही. विश्वासदर्शक ठरावावर मात्र खुल्या पद्धतीने मतदान घेतले जाते. यानुसार मुख्यमंत्र्यांनी हे सभागृह सरकारवर विश्वास व्यक्त करीत आहे, असा ठराव मांडल्यावर अध्यक्ष तो वाचतात. विरोधकांनी यावर मतदानाची मागणी केल्यास ती मान्य करावी लागते. कारण मतदानाची मागणी झाल्यास त्याप्रमाणे मतदान घेणे बंधनकारक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. अध्यक्षांकडून ठरावाच्या बाजूने असलेल्यांनी उभे राहावे, असे सदस्यांना सांगण्यात येते व मग रांगेत सदस्यांनी आपले मत मांडायचे असते. हे खुले मतदान असल्याने विरोधात मतदान केलेला आमदार अपात्र ठरू शकतो. यामुळेच विश्वासदर्शक ठरावावर गुप्त नव्हे तर खुल्या पद्धतीने मतदान घेण्याची शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:19 am

Web Title: ncp vs bjp on legal issues abn 97
Next Stories
1 पाठय़पुस्तक निर्मितीचे काम करणारे शिक्षक अडचणीत
2 अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत
3 ‘आणखी पु. ल.’ विशेषांकाचे शनिवारी ठाण्यात प्रकाशन
Just Now!
X