News Flash

अवघ्या चार महिन्यांत सारे काही उफराटे!

अगदी चार महिन्यांपूर्वी जशी पोलिसांची धावपळ आणि कार्यकर्त्यांची रेटारेटी, गर्दी असायची तशीच राष्ट्रवादी भवनासमोरील मोकळी जागा सोमवारीही त्याचाच अनुभव घेत होती.

| February 17, 2015 03:54 am

अगदी चार महिन्यांपूर्वी जशी पोलिसांची धावपळ आणि कार्यकर्त्यांची रेटारेटी, गर्दी असायची तशीच राष्ट्रवादी भवनासमोरील मोकळी जागा सोमवारीही त्याचाच अनुभव घेत होती. फरक इतकाच होता, आबा आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या घोषणेच्या जागी जब तक चांद सूरज रहेगा, आबा तुम्हारा नाम रहेगा, आर. आर. आबा अमर रहे, अशा भावनावेगाने सारा परिसर दु:खमय झाला होता. सारे काही उलटे, उफराटे झाले होते.
आबांचा देह काचेच्या पेटीत विसावला होता. नेते, कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला होता. आबांच्या पायाशी बसलेले कुटुंब शोकसागरात बुडून गेले होते. शोकाकुल वातावरणातच आबांचे पार्थिव रुग्णवाहिकेमध्ये ठेवले. आबा अखेरच्या प्रवासाला निघाले, अनेकांना अश्रूंचे बांध आवरता आले नाहीत.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्राला चटका लावून आबा निघून गेले. लीलावती हॉस्पिटलमधून सायंकाळी सातच्या सुमारास आबांचे पार्थिव राष्ट्रवादी भवनासमोर काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर सामान्य कार्यकर्त्यांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ यांना अश्रू आवरता आले नाहीत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, राजेंद्र शिंगणे, शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, हेमंत टकले, प्रकाश बिनसाळे, जितेंद्र आव्हाड, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, मनसे नेते राज ठाकरे यांच्याबरोबरच हजारो कार्यकर्त्यांनी आबांचे अखेरचे दर्शन घेतले.

आर. आर. पाटील यांचे अकाली निधन साऱ्यांनाच चटका लावून गेले. तासगाव-कवठेमहांकाळ हा आबांचा मतदारसंघ. आबांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांची कन्या स्मिताकडे बघितले जाते; परंतु तिचे वय लहान असल्याने तूर्तास आबांच्या पत्नीवर राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 3:54 am

Web Title: ncp workers shocked of rr patil death
टॅग : R R Patil,Rr Patil
Next Stories
1 ‘अशांत टापू’तील आवाज..
2 भावुक आणि कठोर
3 राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांच्या तुलनेत आर. आर. आबांची प्रतिमा स्वच्छ
Just Now!
X