मराठवाडय़ाला राष्ट्रवादीच्या विरोधामुळेच अतिरिक्त पाणी मिळाले नव्हते, असा आरोप भाजपने सत्तेत असताना कायम केल्याच्या पार्श्वभूमीवर अवर्षणग्रस्त मराठवाडय़ाला अतिरिक्त पाणी कसे देता येईल यावर विविध पर्यायांवर राष्ट्रवादीकडील जलसंपदा खात्याने भर दिला आहे. नाशिकमधून कसे आणि किती पाणी सोडता येईल याची शनिवारी चाचपणी करण्यात आली.

मराठवाडय़ाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामुळेच वर्षांनुवर्षे पाणी मिळाले नव्हते, अशी टीका भाजपकडून केली जात असे. कृष्णा खोऱ्यातील मराठवाडय़ाच्या हक्काचे १६ टीएमसी पाणीही राष्ट्रवादीच्या विरोधानेच मिळाले नव्हते, असा आरोप झाला होता. याचा काही प्रमाणात मराठवाडय़ात राष्ट्रवादीला निवडणुकीत फटकाही बसला होता. विधानसभा निवडणुकीत मराठवाडय़ात भाजपला १६ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी आठ जागा मिळाल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ाला अतिरिक्त पाणी कसे देता येईल या दृष्टीने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने चाचपणी सुरू केली.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांशी या मुद्दय़ावर  चर्चा केली. गोदावरी खोऱ्यात कुठून पाणी देता येईल यावर विचारविनिमय झाला.  पाण्याची समस्या निर्माण झाल्यावर नाशिकमधून मराठवाडय़ात पाणी सोडले जाते. यावर नाशिक आणि नगरमध्ये मराठवाडय़ाला पाणी सोडण्यास विरोध होतो. पाणी सोडले तरीही नगर पट्टय़ात मराठवाडय़ात जाणारे पाणी उचलले जाते, असेही अनुभवास आले होते.  मराठवाडय़ाला पाणी देण्यास  सरकारने प्राधान्य दिले आहे. नाशिक किंवा गिरणा खोऱ्यातून कसे आणि किती पाणी देता येईल याचा आढावा घेण्यात आला.