पावसाचा जोर आणि अतिवृष्टीचा आधी दिलेला इशारा लक्षात घेऊन मुंबईत शुक्रवार संध्याकाळपासून राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) आणि शहर आपत्ती प्रतिसाद पथक (सीडीआरएफ) सज्ज ठेवण्यात आले आहे.

हिंदमाता, परळ, शीव परिसरांत पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफच्या २५ जवानांची एक, तर सीडीआरएफच्या ५० जवानांची एक तुकडी तैनात आहे. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबईकरांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या जवानांच्या आणखी दोन तुकडय़ा अंधेरी येथे तळ ठोकून आहेत, असे  आपत्कालीन विभागाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी सांगितले.

शनिवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि हिंदमाता, किंग्ज सर्कल, दादर सर्कलसह मुंबईमधील ठिकठिकाणचे सखल भाग जलमय झाले. काही ठिकाणच्या झोपडपट्टय़ांमध्ये पाणी शिरले. पाण्याने नाकाबंदी केल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली, तर रेल्वे मार्गात पाणी साचू लागल्याने लोकल सेवांचे वेळापत्रकही कोलमडले. त्यामुळे कार्यालयाच्या दिशेने निघालेल्यांचे हाल झाले. पहिल्याच पावसाने पालिकेच्या नालेसफाईचे दावे फोल ठरविले. शनिवारी सकाळी पावसाने  शहरासह उपनगरांतील सखल भागात पाणी साचू लागले. हिंदमाता, परळ टीटी, शीव रोड नं. २४, किंग्ज सर्कल, दादर सर्कल, काळाचौकी (सरदार हॉटेलजवळ), भायखळा (लवलेन), आर. ए. किडवाई मार्ग, चार रस्ता, कांजूरमार्ग यासह अनेक ठिकाणी पाणी साचले.

तीन हजार कर्मचारी तैनात 

दुसरा शनिवार असल्याने सरकारी कार्यालये, तसेच बँकांना सुट्टी होती त्यामुळे यंत्रणांना  दिलासा मिळाला. मुंबईतील सखल भागात साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी  तीन हजार अधिकारी-कर्मचारी ठिकठिकाणी तैनात होते. पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी मुंबईतील सखल भागांमध्ये पालिकेने पाणी उपसा करणारे २९७ पंप बसविले असून शनिवारी सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने ६४ पंप कार्यान्वित केले होते.मुंबईमधील काही सब-वे जलमय होऊन वाहतुकीला फटका बसत होता. मात्र यावेळी मुंबईतील कोणताही सब-वे पाण्याखाली गेलेला नाही, असा दावाही पालिकेने केला आहे.

ठाणे शहरात ८९  मि.मी. पाऊस

ठाणे शहरात ८९ मि.मी तर जिल्ह्य़ात गेल्या चोवीस तासात ४०५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामध्ये भिवंडी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.  कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, शहापूर तालुक्यात मात्र जेमतेम २० ते ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली तसेच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात शुक्रवारी मध्यरात्री विजेचा कडकडाट आणि सोसाटय़ांच्या वाऱ्यासह सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा जोर पहाटेपर्यंत कायम होता. शनिवारी सकाळनंतर मात्र ठाणे आणि भिवंडी शहर वगळता आसपासच्या शहरात आणि ग्रामीण भागात जोर कमी झाल्याचे चित्र होते.

राज्यभरात पाऊस

  • सिंधुदुर्गला पावसाने झोडपले. मालवणमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळली.
  • मोसमी पावसाआधीच नागपूर चिंब. वाशीम जिल्हय़ात सर्वदूर पाऊस
  • पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, सांगलीत पावसाची दडी
  • भंडारदरा पाणलोट क्षेत्रात वादळी पाऊस