News Flash

नवउद्य‘मी’ : ऑफर्स आसपास

हे अ‍ॅप विकसित करण्यासाठी सुरुवातीला स्वत:जवळील निधीचा वापर करण्यात आला.

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी गेल्यावर आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच्या आसपास कोणते चांगले हॉटेल अथवा खरेदीसाठी दुकाने आहेत याचा शोध आपण घेत असतो. पूर्वी पर्यटन मार्गदर्शकांची मदत घेतली जायची. यानंतर सध्याच्या काळात गुगलची मदत घेतली जाते. गुगलने सांगितल्याप्रमाणे आपण त्या दुकानात पोहोचतो आणि खरेदीही करतो. मात्र खरेदी झाल्यावर आपल्याला लक्षात येते की दुसऱ्या दुकानात तर सवलती होत्या. हा गोंधळ टाळण्यासाठी ‘नीअर यू’ हे अ‍ॅप तुम्हाला मदत करू शकणार आहे.

अशी झाली सुरुवात

आपल्या कुटुंबाचा पायाभूत सुविधांच्या व्यवसायात काम करत असताना तंत्रज्ञानाची आवड असलेल्या हेमंथ मेका राव यांनी फेसबुक अ‍ॅप विकसित केले. फेसबुकवरील अ‍ॅपला म्हणावा इतका प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी ब्लॅकबेरी ऑपरेटिंग प्रणालीवर एक अ‍ॅप सुरू केले. या अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळाला. पाच लाखांहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आणि त्यासाठी आकारलेले पैसेही भरले. पण कालांतराने त्याचा वापरही कमी होऊ लागला. ‘एके दिवशी पत्नीसोबत हॉटेलमध्ये गेलो असताना जेवण झाल्यावर क्रेडिट कार्डने पैसे भरले. त्या वेळेस माझ्या सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डवर संबंधित हॉटेलमध्ये पैसे भरल्यास सवलत आहे, हे माझ्या लक्षात आले. माझ्या क्रेडिट कार्डवर अशी ऑफर आहे हे मला माहितीच नव्हते. अशा अनेक ऑफर्सबाबत लोक अनभिज्ञ असतील. त्यामुळे त्यांना ही माहिती उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभी करण्याचा विचार त्याच वेळी माझ्या मनात आला,’ अशी कल्पनेमागची पाश्र्वभूमी कथन करताना हेमंथ यांनी सांगितले.

आज लोकांकडे महाजालातील माहितीचे मोठे भांडार आहे. मात्र त्यांना पाहिजे ती माहिती नेमकी उपलब्ध होत नाही. यामुळे माहिती असून त्याचा फारसा उपयोग होत नाही. आपल्या बाजूच्या एका दुकानात सवलत आहे तर दुसऱ्या दुकानात सवलत उपलब्ध नाही आणि आपण नेमके जेथे सवलत नाही अशा दुकानातून खरेदी करतो असे घडते. मग आपल्याला हुरहुर लागते. यामुळे ऑफलाइन दुकानांना माहितीच्या महाजालात आणून त्यांच्या सवलतींचा तपशील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ‘नीअर यू’ या अ‍ॅपचा जन्म झाला.

आपण ज्या परिसरात आहोत त्या परिसरातील कोणत्या दुकानांमध्ये कोणत्या सवलती किंवा ऑफर्स उपलब्ध आहेत याचा तपशील काही सेकंदांत आपल्या मोबाइलवर या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होतो. यासाठी कंपनीने देशभरातील आठ हजारहून अधिक किरकोळ विक्रेत्यांशी सहकार्य करार केला आहे. त्यानुसार त्यांचा तपशील कंपनीपर्यंत येतो व कंपनी तो लोकांपर्यंत पोहोचवत असते. आज बाजारात ऑफर्सची माहिती देणारे अ‍ॅप्स आहेत मात्र त्यासाठी त्या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला व्यवहार करावा लागतो. पण या अ‍ॅपच्या बाबतीत तसे होत नाही. या अ‍ॅपमध्ये आपल्याला केवळ माहिती पुरविली जाते. ही माहिती देत असताना आपण असलेल्या ठिकाणापासून कोणते दुकान किती अंतरावर आहे व तेथे कोणत्या ऑफर्स किती कालावधीसाठी आहेत याचा तपशीलही देण्यात येतो. याचबरोबर दुकानाचा पत्ता व संर्पक क्रमांकही यात देण्यात येतो. हे अ‍ॅप वापरण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवावे लागते. त्याच्या आधारे आपल्या आसपास कोणत्या ऑफर्स आहेत याचा तपशील पुरविला जातो. यात वाहने, कपडे, मनोरंजन, फॅशन, आरोग्य आणि सौंदर्य, गृह, हॉटेल्स असे पर्यायही देण्यात आले आहेत. या पर्यायांनुसार तुम्हाला पाहिजे त्या विभागातील ऑफर शोधता येते. याशिवाय आपले जीपीएस सुरू असेल आणि आपण ज्या परिसरात आहोत त्या परिसरात एखादी चांगली ऑफर असेल तर त्याचा तपशीलही नोटिफिकेशनद्वारे आपल्याला कळविला जातो. यामुळे ऑफर्ससाठी हे एक परिपूर्ण अ‍ॅप असल्याचा विश्वास हेमंथ यांना वाटतो.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

हे अ‍ॅप विकसित करण्यासाठी सुरुवातीला स्वत:जवळील निधीचा वापर करण्यात आला. यानंतर नुकताच गुंतवणूकदारांकडून १.४० कोटींचा निधी उभा करण्यात आला आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी वापरकर्त्यांला कोणताही दर आकारला जात नाही. हा दर किरकोळ विक्रेत्याला आकारला जातो. प्रत्येक क्लिकसाठी तीन रुपये इतका अत्यल्प दर असल्याने विक्रेतेही अ‍ॅपवर समाधानी आहेत. या तीन रुपयांमध्ये विक्रत्यांना लाखो वापरकर्त्यांपर्यंत पोहोचविले जाते याचबरोबर त्यांच्या ऑफर्स झळकवण्यासाठी आवश्यक असे ग्राफिकही तयार केले जाते. यामुळे ज्या विक्रेत्यांना स्वत:ची जाहिरात करण्यासाठी खर्च करायचा नसेल अशा विक्रेत्यांना तर याचा अधिकच फायदा होत असल्याचे हेमंथ म्हणाले.

भविष्यातील वाटचाल

सध्या आमचे ध्येय हे विक्रेत्यांची संख्या वाढविण्यावर आहे. आमच्या अ‍ॅपची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यात आलेली नाही. या अ‍ॅपला मिळालेले डाऊनलोड्स हे केवळ मौखिक प्रसिद्धीतून मिळालेले आहेत. यामुळे जाहिरातींद्वारे लोकांपर्यंत पोहोचून वापरकर्त्यांची संख्या दोन ते तीन लाखांपर्यंत नेण्याचा उद्देश असल्याचे हेमंथ म्हणाले. तसेच महानगरांबरोबरच शहरे व निमशहरांमध्येही पोहोचायचा आमचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले.

नवउद्यमींना सल्ला

तुम्हाला जर नवउद्योग सुरू करायचा असेल तर तुम्ही महाविद्यालयीन वयातच सुरू करावा. जेणेकरून त्या काळात तुमच्यावर फारशी जबाबदारी नसते. यामुळे तुम्ही अधिक मेहनतीने काम करू शकता व तुम्हाला अपेक्षित ते मिळवू शकता, असा सल्ला हेमंथ यांनी दिला आहे. याचबरोबर आपल्या देशातील विद्यापीठांना माझी एक सूचना आहे ती म्हणजे विद्यापीठ स्तरावर पदवीच्या शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना नवउद्योग सुरू करण्याचा प्रकल्प द्यावा जेणेकरून आपल्या समाजातील तसेच व्यवसायातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी उत्तरे मिळू शकतील असेही हेमंथ म्हणाले.

नीरज पंडित niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 2:25 am

Web Title: nearu android apps to know offer in surroundings area
Next Stories
1 सारासार : धुळीचे साम्राज्य
2 सेवाव्रत : वात्सल्याचा झरा
3  ‘विद्युत ऑडिट’ होत नसल्याने निवासी संकुलात आगीच्या घटना
Just Now!
X