‘बलुतं’च्या चाळीशीनिमित्त आयोजित कार्यक्रमात रावसाहेब कसबे यांचे मत

इतिहासापासून पळून जाता येत नाही. मात्र त्यावर मात करून नवी समाजरचना करणे आवश्यक आहे. ‘बलुतं’सारख्या सर्जनशील साहित्यात प्रतिबिंबित झालेले हे विचार आपण समजून घेतले तर आपले जीवन सार्थ होईल, असे मत सामाजिक विषयांचे अभ्यासक रावसाहेब कसबे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

दया पवार लिखित ‘बलुतं’ या कादंबरीला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय संमेलनात कसबे बोलत होते. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि ग्रंथाली वाचक चळवळ यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते.

‘साहित्य म्हणजे कलावंताने निसर्गाशी, समाजाशी आणि स्वत:शी केलेला संवाद असतो. लेखक समाजाशी एकरूप होतो तेव्हाच हा संवाद साधण्याची क्षमता लेखकात येते. दया पवार समाजाच्या अंतरंगात शिरत हे त्यांच्या साहित्याचे रहस्य आहे,’ असेही कसबे म्हणाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेते, कवी आणि सामाजिक कार्यक र्ते सयाजी शिंदे, लेखक  आणि समीक्षक राहुल कोसंबी, लेखक व कवी आनंद िवगकर यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात बलुतंची चाळिशी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल, डॉ. रावसाहेब कसबे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि साहित्यिक रामदास फुटाणे सहभागी झाले होते. ‘दया पवार यांनी बलुतंमध्ये दैनंदिन आयुष्यातील वास्तव चित्रण केले असून ही परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे,’’ असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी या सत्रात व्यक्त केले.

दुसऱ्या सत्रातील ‘दलित साहित्य – साचलेपण की विस्तार’ या विषयावरील परिसंवादात कवी सुदाम राठोड आणि कवयित्री धम्मसंगिनी रमागोरख सहभागी झाल्या होत्या.

‘दलित स्वत:च मुख्य प्रवाह’

‘‘दलित साहित्य ही जातीपल्याड जाणारी विचारधारा आहे,’’ अशी भूमिका सुदाम यांनी मांडली. ‘‘दलितांनी मुख्य प्रवाहात यावे असे म्हणण्याचा काळ गेला. आता दलित स्वत:च मुख्य प्रवाह बनले आहेत. आम्हाला माणूस माना असे सांगण्याची गरज आता दलितांना नाही. ज्यांची माणुसकी संपली आहे त्यांनी दलितांसोबत येण्याची गरज आहे,’’असे धम्मसंगिनी म्हणाल्या. तिसऱ्या सत्रात ‘बाई मी धरण बांधिते’ या कार्यक्रमात कवी सौमित्र आणि प्रा. प्रज्ञा दया पवार यांनी दया पवार यांच्या काही गाजलेल्या कवितांचे सादरीकरण केले.