करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी देशातील सर्व उद्योगधंदे बंद करावे लागले आहेत. त्यामुळे देशावर व राज्यावर मोठे आर्थिक व बेरोजगाराची संकट येणार आहे. राज्यात उद्भवणाऱ्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केली आहे.

करोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेशी पवार यांनी सोमवारी समाजमाध्यमाद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, करोना साथरोगामुळे संपूर्ण देशाच्या अर्थकारणावर व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम, यामुळे नवीन संकटांचा मुकाबला करण्याची वेळ येणार आहे.  त्यात सर्वाधिक मोठे संकट हे रोजगार कमी होऊन रोजगार बुडण्याचे आहे. या बुडणाऱ्या रोजगाराला तोंड कसे द्यायचे, याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे.

राज्यात उद्भवणाऱ्या आर्थिक व बेरोजगारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांना सोबत घेऊन, त्यांचा सल्ला घेऊन पुढचे सहा महिने, वर्षभर महाराष्ट्रात कशा पद्धतीने पाऊले टाकावी लागतील, त्याचा विचार करावा लागेल, असे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आवाहन केले आहे. अर्थकारणावर होणारा परिणाम तसेच बेरोजगारी व तत्सम प्रश्न निर्माण होतील यातून बाहेर कसे पडायचे यावर उपाययोजना व कृती करण्यासाठी ‘टास्क फोर्स‘ नेमणे उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले, असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

अंधश्रद्धा नको

महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धेचे कधीच समर्थन केलं नाही, त्यामुळे अंधश्रद्धेच्या मागे आपण जाणं योग्य नाही. अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते आणि ज्यावेळी माणूस दैववादी बनतो, त्यावेळी माणसातील चिकित्सा करण्याची प्रवृत्ती आणि विचारांची चिकित्सा करण्याचा मार्ग थांबतो. म्हणून काही झाले तरी माणसाने चिकित्सक असले पाहिजे. अंधश्रद्धेचा पुरस्कार करता कामा नये. ज्ञानाचे समर्थन करण्याची भूमिका अखंडपणे स्वीकारली पाहिजे आणि त्या रस्त्याने आपण जाण्याचा निर्धार करू या, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.