पोलिसांची न्यायालयात भूमिका, आरोपी नीरज देसाई यांना २५ मार्चपर्यंत कोठडी

हिमालय पुलासह डी. डी. देसाई कंपनीने संरचनात्मक तपासणी केलेल्या अन्य ७५ पुलांचा अहवाल योग्य आहे का, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात मांडली.

पूल दुर्घटनेचा तपास तांत्रिक आणि गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे अटक आरोपी नीरज देसाई यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीची आवश्यकता आहे. त्यांना १४ दिवस पोलीस कोठडीत पाठवावे, अशी विनंती मंगळवारी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने देसाई यांची २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

देसाई यांच्या प्रो. डी. डी. देसाईज असोसिएटेड इंजिनीअरिंग कन्सल्टण्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅनालिस्ट्स कंपनीकडे महापालिकेने ७६ पुलांच्या संरचनात्मक तपासणीचे कंत्राट दिले होते. हिमालय पुलाचाही त्यात समावेश होता. पुलाची प्रत्यक्ष तपासणी केली तेव्हा देसाई कंपनीच्या तज्ज्ञ, अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या कच्च्या नोंदी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

संरचनात्मक तपासणीत महत्त्व असलेल्या एका चाचणीची (नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट, एनडीटी) जबाबदारी देसाई यांच्या कंपनीने गुजरातमधील जीओ डायनामिक्स कंपनीवर सोपवली होती.

जीओ डायनामिक्स कंपनीने देसाई कंपनीला सुपूर्द केलेला चाचणी अहवाल पोलिसांनी मागवला आहे. हा अहवाल योग्य होता का, एनडीटी चाचणी अहवाल आणि देसाई कंपनीने महापालिकेला सादर केलेल्या अंतिम तपासणी अहवालात काही तफावत नाही ना, याची चाचपणी पोलीस करणार आहेत.

देसाई यांच्यासोबत पोलीस महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांकडे चौकशी करीत आहेत. या दोघांचे जबाब अद्याप पूर्ण झालेले नाहीत. तपास पूर्णपणे कागदपत्रांवर अवलंबून आहे. १९९०च्या दशकात हा पूल उभारण्यात आला. पुलाशी निगडित सुरुवातीपासूनची कागदपत्रे पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांकडे मागितली आहेत.