‘वैज्ञानिकाशी संवाद’ या ऑनलाइन कार्यक्रमात संशोधकांचे मत

मुंबई- ‘लस घेणे बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. लशीच्या दुसऱ्या मात्रेनंतर एखाद्याला संक्रमण झाले तरी आजार बळावण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र लस घेतल्यानंतर बेफिकीर न होता मुखपट्टी, अंतरनियम यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एकावेळी दोन मुखपट्ट्या परिधान करणे ही काळाची गरज असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले.

सामान्य नागरिकांच्या मनातील करोनाविषयीच्या समज-गैरसमजांवर मार्गदर्शन करण्यासाठी ‘इंडियन सायन्टिस्ट रिस्पॉन्स टू कोविड-१९’ (आयएसआरसी) या गटाने ‘वैज्ञानिकाशी संवाद’ या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी लसीकरण आणि मासिक पाळी, रेमडेसिविरची उपयुक्तता, विषाणूचे उत्परिवर्तन, लसीकरणाचे महत्त्व अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ‘आयएसआरसी’ने आयोजित केलेल्या या संवादात बेंगळूरु येथील राष्ट्रीय जैवविज्ञान केंद्राच्या जीवशास्त्रज्ञ प्रा. दीपा आगाशे, जीवशास्त्रज्ञ डॉ. रोहिणी करंदीकर सहभागी झाल्या होत्या.

करोना विषाणूचे प्रकार कोणते, कोणता प्रकार कोणत्या भागातील रुग्णांमध्ये आढळून येत आहे, विषाणूत होणारे उत्परिवर्तन यांची सैद्धांतिक मांडणी डॉ. आगाशे यांनी केली. तर लसीकरण म्हणजे नेमके काय, याविषयी डॉ. करंदीकर यांनी विश्लेषण केले. ‘लसीकरणाद्वारे संबधित आजाराचा एक कमकुवत विषाणू शरीरात सोडला जातो, ज्यामुळे पांढऱ्या पेशी आजाराशी लढणारी प्रतिपिंडे तयार करतात,’ असे त्यांनी सांगितले. मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे प्रा. अनिकेत सुळे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते.

महिला आणि लसीकरण

मासिक पाळीदरम्यान लस घ्यावी की घेऊ नये याविषयी महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ‘मासिक पाळी ही अत्यंत नैसर्गिक बाब आहे. त्याचा आणि लसीकरणाचा काहीही संबंध नाही. या कालावधीत लस घेण्यात कोणताही धोका नाही,’ असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. तसेच गर्भवती महिला, स्तनदा माता, लहान मुले यांना लसीकरणातून वगळले आहे, कारण त्यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले.