आठवडय़ाची मुलाखत ; चंद्रकांत लट्ट  (वृक्ष अभ्यासक)

रुग्णालय, रस्ते, शाळा बांधकाम यासाठी पालिका कंत्राट देते तेव्हा त्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकांचे त्या-त्या विभागातील कामाचा अनुभव असलेले अभियंते नेमले जातात. मात्र पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी असो की पावसाळ्यात झाडांचे वृक्षारोपणाचे काम असो.. ते काम केवळ कंत्राटदारांच्या अकुशल कामगारांवर सोडून दिले जाते. झाडांची छाटणी व वृक्षारोपण शास्त्रीय पद्धतीने होत नसल्याने थोडय़ाशा वाऱ्यापावसातही शहरातील झाडे मोठय़ा प्रमाणावर पडतात. शहर हे मानवाने वसवलेली परिसंस्था आहे. जंगलात केवळ बी टाकून रोप उगवते व त्याचा वृक्ष होतो तसे शहरात होणार नाही. त्यामुळे झाडांच्या मशागतीकडे काटेकोर लक्ष द्यायला हवे असे वृक्ष अभ्यासक चंद्रकांत लट्ट यांनी सांगितले.

* पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात वृक्षहानी होत आहे, त्याची कारणे?

पावसाच्या सुरुवातीला जोरदार वाऱ्यांमुळे झाडे पडतात. मात्र शहरातील रस्त्यांवरील झाडे पडण्यासाठी इतर कारणेही आहेत. सर्वात महत्त्वाची असते ती झाडाच्या आजुबाजूची जागा. मैदानात, मोठय़ा प्रांगणात लावलेल्या झाडांची मुळे खोलवर पसरतात व माती घट्ट धरून ठेवतात. मुळांना अडवणारी तसेच मातीत पाणी जाण्यापासून रोखणारे बांधकाम नसले की झाडे मजबूत होतात व अशी झाडे अनेक वर्षे वादळवाऱ्यातही उभी राहतात. मात्र रस्त्यांवर, पदपथांवर, गटारांच्या बाजूला असलेल्या झाडांबाबत असे होत नाही. जमिनीखाली गटारांच्या बांधकामामुळे मुळे पसरण्यास अटकाव होतो तर वर थेट खोडापर्यंत आलेले डांबर, सिमेंट काँक्रीट यामुळे मुळांना वरून माती, खत घालता येत नाही. यामुळे अशक्त झालेले झाड वाऱ्यापावसात तग धरत नाही. बऱ्याचदा गुलमोहोर, जांभूळ अशी झाडे पावसात लवकर पडतात.

* गुलमोहोर, जांभूळ  ही झाडे नाजूक असतात का?

या झाडांची मुळे जमिनीत खोलवर जात नाहीत. त्यामुळे त्यांचा आधार पक्का नसतो. जंगलात उगवणारे जांभळाचे झाड सहसा पडत नाही. वड, पिंपळ आणि आंब्यासारखी कणखर झाडेही पावसात पडतात. या पावसाळ्यात विलेपार्ले येथील रस्त्यावर आंब्यांचे ५० फुटी झाड उन्मळून पडले. खोडापर्यंत आलेल्या पेव्हर ब्लॉक व त्याच्याखाली असलेल्या सिमेंट रेतीसह सर्व मुळे वर आली होती. फोर्ट परिसरात जोरदार वाऱ्यात अडकल्याने वडा, पिंपळाची झाडे पडताना मी पाहिली आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी झाडांबाबतच्या उदासीनतेमुळेच ती पडतात, असे दिसते.

* रस्त्यावर झाडे लावू नयेत का?

रस्त्यांवर झाडे जरूर लावावीत. पण त्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. जंगलात केवळ बी टाकून रोप उगवते, तसे शहरात होणार नाही. वृक्षारोपण करताना कोणत्या जागी कोणत्या प्रकारची झाडे लावावीत त्याचा विचार करायला हवा. मोठय़ा रस्त्यांवर वड, पिंपळ, पर्जन्यवृक्ष अशी मोठा घेर असलेली झाडे जगतील, मात्र थोडय़ा लहान रस्त्यावर करंज, बकुळ, तामण, भेंड अशी झाडे लावता येतील. अगदी लहान गल्लीत छोटा तामण, सोनचाफा, कुंती, कामिनी लावावीत. रस्त्यांवर झाडे लावताना सौंदर्यदृष्टीही ठेवायला हरकत नाही. एखाद्या रस्त्यावर एकाच प्रकारची झाडे लावण्याचा प्रयोग करायला काय हरकत आहे? गोदरेज लेनमध्ये फक्त बहावा लावला आहे. एप्रिल-मेमध्ये चमकदार पिवळ्या फुलांनी ही झाडे बहरली की रस्ता अप्रतिम दिसतो. जपानमध्ये अनेक रस्त्यांवर केवळ चेरीब्लॉसम आहे. त्यांच्याकडे हिवाळ्यात गुलाबी रंगांनी रस्ते खुलून दिसतात. आता वृक्षारोपण करताना असा विचार केला तर पाच वर्षांनी त्याचे परिणाम दिसतील. मात्र एक लाख झाडे लावायची ठरवली की कंत्राटदार खड्डे खणत जातात व त्यात रोप डकवत जातात. कोणते रोप कुठे, किती अंतरावर, कसे लावावे हे सांगणारा कोणीही मार्गदर्शक तिथे नसतो.

* पण झाडे लावायला शहरात जागा नाही, असे सांगितले जाते.

प्रत्येकाला शहर हिरवे हवे आहे, पण झाड लावायला जागा देण्याचे अनेकजण टाळतात. इमारतीत झाडे लावायची म्हटली की आमच्या मुलांना खेळायला जागा राहणार नाही, गाडय़ा पार्क कुठे करायच्या असे प्रश्न विचारले जातात. रस्त्यांवर झाडे लावताना दुकानदार आडकाठी करतात. वृक्षलागवड करताना पालिकेचा अधिकारी असेल तर तो त्याच्या अधिकाराचा वापर करून स्थानिकांना समजावू शकतो. मात्र कंत्राटदारांना याबाबत काही देणेघेणे नसल्याने या ठिकाणी रोपे लावले जात नाहीत किंवा लावले तर काही दिवसांनी ती आपोआप नाहीशी होतात.

* झाडे पडू नयेत यासाठी काय करता येईल?

रस्त्यांवर, पदपथांवर झाडे लावताना त्याच्या बाजूला चौकोनी पार बांधावा. वर्षांतून किमान एकदा तरी त्याला खत, माती घालावे. त्याला कुंपण करावे. रोप लहान असताना त्याची नियमित देखभाल करावी. अशी सशक्त झाडे वाऱ्यापावसात तग धरू शकतात. झाडांची छाटणीही शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवी. कुंपणभिंतीजवळ किंवा इमारतीशेजारी लावलेले झाड अनेकदा वाढण्यासाठी एका दिशेला वाकते. ही झाडांचा तोल आधीच बिघडलेला असतो. त्यात एकाच बाजूने फांद्या छाटल्या की ती पावसात पडतात. झाड पडल्याची संख्या नोंदवली जाते. हे झाड का पडले, त्याची प्रजाती, त्याची उंची-घेर, त्याच्या आजुबाजूचा परिसर याचीही नोंद झाली पाहिजे म्हणजे भविष्यातील झाडांचे अपघात कमी करता येतील.

* पण पालिका आता शास्त्रीय पद्धतीने वृक्षछाटणी करण्यावर भर देतात..

अशी शास्त्रीय वृक्षछाटणी कोणाच्या मार्गदर्शनाखाली होते? मी अनेकदा झाडांची छाटणी करणाऱ्या कामगारांना विचारले आहे. तिथे कंत्राटदाराचा माणूस असतो. मात्र वृक्षअधिकारी नसतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी हजर राहू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे. कदाचित त्यांच्यावर इतर कामांची जबाबदारी असेल. मात्र त्यामुळे वृक्षछाटणीसारखे शास्त्रीय व कौशल्याचे काम अकुशल कंत्राटदारांवर सोडावे का? शास्त्रीय छाटणी होते आहे, याची माहिती कुठे लिहून ठेवली जाते का? वृक्षछाटणीच्या नावाखाली झाडांचा फक्त बुंधा ठेवल्याचे अनेकदा दिसले आहे. अशा झाडांना पुन्हा हिरवेगार होण्यासाठी दोन-तीन वर्ष लागतात. याला जबाबदार कोण? इतर प्रकल्पांप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा अधिक लक्ष वृक्षारोपण व वृक्षछाटणीवर देण्याची गरज आहे.

प्राजक्ता कासले – prajakta.kasale@expressindia.com