28 February 2021

News Flash

‘मेट्रो-३’च्या बांधकामस्थळावरील ध्वनिप्रदूषणाची तपासणी ‘निरी’कडून

मेट्रो-३’च्या मार्गिकेच्या प्रस्तावित स्थानकांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

शहरातील विविध भागांत मेट्रो-३चे काम सुरू आहे. (छाया : अमित चक्रवर्ती)

दक्षिण मुंबईतील ‘मेट्रो-३’च्या बांधकामस्थळांवर होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत या भागातील रहिवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असून या तक्रारींची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट’वर (निरी) ध्वनीची पातळी तपासण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ‘निरी’चे अधिकारी बांधकामस्थळांना भेट देत असून ध्वनिप्रदूषणाचे निर्देशांक नोंदविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मेट्रो-३’च्या मार्गिकेच्या प्रस्तावित स्थानकांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या संदर्भात दक्षिण मुंबईतील नागरिकांनी बांधकामस्थळांवरील वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा अधोरेखित करुन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने ‘मेट्रो-३’ प्रशासनाला रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत काम बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही रहिवाशांकडून वाढत्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनिप्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी ‘निरी’ या संस्थेची नियुक्ती केली आहे. आता कफ परेड, चर्चगेट, विधान भवन आणि गिरगाव येथील बांधकामस्थळांवरील ध्वनीच्या पातळीची नोंद करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘निरी’च्या अधिकाऱ्यांनी तपासणीच्या कामाला सुरुवात केली आहे.

दक्षिण मुंबईतील ‘मेट्रो-३’च्या बांधकामस्थळावर निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘निरी’ची नियुक्ती येथील ध्वनिप्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी केल्याची माहिती ‘निरी’च्या मुंबई क्षेत्रीय अधिकारी कोमल कलावपूडी यांनी दिली. चारही बांधकामस्थळांवर ४८ तासांसाठी तपासणीचे काम सुरू असून त्यापैकी कामाच्या दिवसांतील २४ तास आणि सुट्टीच्या दिवसांतील २४ तास या पद्धतीने तपासणी सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. सद्य:स्थितीत तपासणी सुरू असलेल्या कफ परेड येथील बांधकामस्थळावर मेट्रो प्रशासनाने ध्वनिरोधक लावले आहेत. मात्र नागरिकांनी आमच्याकडे ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे ध्वनिप्रदूषण तपासणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून अहवालामधून नियंत्रणाबाहेरील निर्देशांक निघाल्यास त्यासंदर्भात मेट्रो प्रशासनाला निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील एका अधिकाऱ्याने दिली.

एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात अहवाल

दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपासणीच्या कामाला सुरुवात झाली असून एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात तपासणीचा अहवाल प्रदूषण मंडळाला देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 3:45 am

Web Title: neeri to check noise pollution during mumbai metro 3 construction
Next Stories
1 ‘लोकसत्ता गप्पां’च्या पुढच्या पर्वात संवाद ‘रावीपार’च्या लेखकाशी
2 वैद्यकीय प्रवेशातील गोंधळाबाबत विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात
3 विहिंपमधील सत्तासंघर्ष चिघळणार!
Just Now!
X