मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) देणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरचे परीक्षा केंद्र मिळाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिलेल्या केंद्राऐवजी दुसऱ्याच शहरातील केंद्र मिळाले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

वैद्यकीय, दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ची प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना मिळू लागली आहेत. ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील १८ केंद्रांचे पर्याय विद्यार्थ्यांना दिले होते. त्यापैकी चार केंद्रांचे प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांना द्यायचे होते. मात्र प्रथम प्राधान्यक्रमाचे केंद्र मिळाले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गावांच्या नावातील साधम्र्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी ५०० कि.मी.वरचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांना ऐन उन्हाळ्यात ९ ते १० तासांचा प्रवास परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी  करावा लागणार आहे. वाशिमच्या विद्यार्थ्यांला नगरमधील केंद्र, कोकणातील विद्यार्थ्यांना मुंबईतील केंद्र मिळाले आहे. मुंबईतील काही विद्यार्थ्यांनाही नवी मुंबई, रायगड येथील केंद्रही मिळाले आहे. दूरची केंद्रे मिळाल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. प्रवेशपत्रामध्ये इतरही चुका असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मुळातच विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण असताना दूरचे परीक्षा केंद्र मिळाल्यामुळे ताण आणखी वाढला आहे,’ असे ऊर्मिला शहा या पालकांनी सांगितले.