मुंबई : परीक्षा केंद्र न मिळणे, विद्यार्थ्यांना पोहोचण्यास झालेला उशीर असे काही अपवाद वगळता मुंबई आणि परिसरातील केंद्रांवर राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) सुरळीत पार पडली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची ६१५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. मुंबई आणि परिसरातील बहुतेक केंद्रांवर परीक्षा सुरळीत झाली.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक परीक्षा केंद्रावर काळजी घेण्यात येत होती. अंतरनियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. त्याआधी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. परीक्षेला पोहोचण्यास उशीर झाला म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मज्जाव करणे, नियमानुसार कपडे नाहीत म्हणून परत पाठवणे असे गेली काही वर्षे गाजलेले गोंधळ यंदा फारसे दिसले नाहीत. एखाद्या विद्यार्थ्यांला अगदी काही मिनिटे उशीर झाल्यास त्यांना केंद्रावरील कर्मचारी सहकार्य करत होते.

दरम्यान, वडाळा येथील केंद्रावर प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उशिरा मिळाली, मात्र या विद्यार्थ्यांना वेळही वाढवून देण्यात आला.

केंद्र बदलल्याने गोंधळ..

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार काही परीक्षा केंद्रे बदलण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी ‘एनटीए’ने त्याबाबतची माहिती संकेतस्थळावर दिली होती. मात्र, सर्व विद्यार्थी आणि बदललेल्या केंद्रांपर्यंत ही माहिती न पोहोचल्यामुळे काही केंद्रांवर गोंधळाची स्थिती होती. चर्चगेट येथील केंद्र मिळालेल्या विद्यार्थ्यांचे केंद्र बदलण्यात आले. मात्र, त्याच्या पत्त्याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही विद्यार्थ्यांना केंद्र बदलल्याची माहिती मिळाली नव्हती. चर्चगेट येथील केंद्रावर पोहोचल्यावर केंद्र बदलल्याची माहिती मिळाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.