वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी देशभरात होणार असून त्यासाठी राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून (एनटीए) नीटचे नियोजन करण्यात आले असून राज्यात ६१५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राज्यातील साधारण १० ते १२ हजार जागांसाठी सव्वादोन लाख विद्यार्थी परीक्षा देतील. मुंबई आणि परिसरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोकल रेल्वेने प्रवास करता येणार आहे. देशातील १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून त्यासाठी ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रआहेत.

विद्यार्थ्यांना सूचना

* करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी मुखपट्टी आणि हातमोजे वापरणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्र, ओळखपत्र, छायाचित्र विद्यार्थ्यांनी जवळ बाळगायचे आहे.

* पाण्याची पारदर्शक बाटली विद्यार्थी जवळ बाळगू शकतील. प्रवेश पत्रावर पालकांची स्वाक्षरी असावी. विद्यार्थ्यांनी फिक्या रंगाचे, अर्ध्या बाह्य़ांचे कपडे, चप्पल वापरावेत. त्याचप्रमाणे कपडय़ांवर मोठी चित्रे, अक्षरे, बिल्ले नसावेत. बूट, जीन्सची पॅँट वापरण्यास परवानगी नाही. परीक्षा केंद्रात मोबाईल नेण्यासही मनाई आहे.