राज्यातील चार लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबत गंभीर पेच
‘नीट’ सक्तीचा फटका यंदा केवळ एमबीबीए, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनाच नव्हे तर महाराष्ट्रात २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत होमिओपथी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तब्बल चार लाख विद्यार्थ्यांनाही बसणार आहे. २४ जुलैला होणाऱ्या ‘नीट-२’मुळे महाराष्ट्रातील एमबीबीएस-बीडीएसची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबपर्यंत लांबणार आहे. त्यामुळे, पाठोपाठ होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तब्बल १.८३ लाख जागांच्या प्रवेशांबाबतही गंभीर पेच निर्माण झाला आहे. प्रवेश प्रक्रिया लांबविल्यास सर्वच अभ्यासक्रमांचे पुढचे शैक्षणिक वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता आहे.
एमबीबीएस-बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळापत्रकावर इतर व्यावसायिक व्यावसायिक अभ्यासक्रमांची वेळापत्रके अवलंबून असतात. कारण, विद्यार्थ्यांची पहिली पसंती या दोन अभ्यासक्रमांना असते. त्या खालोखाल अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, वैद्यकीयचे होमिओपॅथी, फिजिओथेरपी आदी इतर अभ्यासक्रमांना विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार पसंती देतात. म्हणून दर वर्षी एमबीबीएस-बीडीएसची किमान पहिली प्रवेश फेरी पार पडली की इतर अभ्यासक्रमांकरिता प्रवेश फेऱ्यांचे आयोजन करण्याचे पथ्य संबंधित यंत्रणा पाळतात. एमबीबीएस-बीडीएसच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी विनाकारण इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा प्रवेश घेऊन अडवून ठेवू नयेत, हा त्या मागचा हेतू असतो. परंतु, ‘यंदा एमबीबीएस-बीडीएसच्या आधीच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश केल्यास अभियांत्रिकी, होमिओपथी, आयुर्वेद आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहण्याची शक्यता आहे. या रिक्त होणाऱ्या जागा नामांकित महाविद्यालयांमधील असतील. त्या ठिकाणी इतर विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास त्या वाया जाण्याची शक्यता आहे,’ अशा शब्दांत तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी हा पेच मांडला. यावर तोडगा काढण्यासाठी गरज भासल्यास वकिलांचा सल्ला घेणार असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.
आम्ही एमबीबीएस-बीडीएसची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबपर्यंत कशीबशी पूर्ण करू. परंतु, इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांकरिता आम्हाला आणखी १० ते १५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे, शैक्षणिक वेळापत्रक कोलमडणार आहे. शैक्षणिक वर्षच उशिराने सुरू होणार असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय गत्यंतर नसेल.
– डॉ. प्रवीण शिनगारे,
संचालक, वैद्यकीय शिक्षण

दोन्ही पर्याय अडचणीचे ..तर जागा रिक्त राहतील
वेळापत्रक विस्कळीत न करता प्रवेश करायचे ठरले तर एमबीबीएस-बीडीएसची प्रवेश प्रक्रिया आटोपल्यानंतर अनेक चांगल्या शिक्षण संस्थांमधील जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. याचा फटका अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, आयुर्वेद, होमिओपथी, फिजिओथेरपी, युनानी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण प्रवेशाची मुदत उलटून गेल्यानंतर जागा भरता येणार नाहीत.

Untitled-34