मुंबई : परदेशातील संस्थांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) देणे बंधनकारक असून या परीक्षेचे गुण तीन वर्षे ग्राह्य़ धरण्याचा निर्णय भारतीय वैद्यक परिषदेने घेतला आहे. त्यामुळे परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या देशातील मर्यादित जागा, वाढते शुल्क यांमुळेगेल्या काही वर्षांपासून परदेशी जाऊन वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. परदेशातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याचा खर्च हा भारतातील खासगी महाविद्यालयांच्या शुल्कापेक्षा कमी होतो. मात्र या महाविद्यालयांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्या पाश्र्वभूमीवर परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नीट देणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता या विद्यार्थ्यांना वैद्यक परिषदेने काहीसा दिलासा दिला आहे.

गेल्या वर्षी आयत्या वेळी नीट लागू करण्याचा नियम विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा निर्वाळा देत न्यायालयाने परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीटमधून दिलासा दिला होता. मात्र यंदापासून (२०१९-२०) परदेशातील महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट द्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा

आतापर्यंत नीटचे गुण एक वर्षांसाठीच ग्राह्य़ धरण्यात येत होते. आता नीटचे गुण हे तीन वर्षांसाठी ग्राह्य़ धरण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. परदेशी विद्यापीठांचे शैक्षणिक वेळापत्रक आणि भारतीय विद्यापीठांच्या वेळापत्रकात फरक असतो. त्याचप्रमाणे परदेशी जाण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रियाही वेळखाऊ असते. त्यामुळे नीटच्या वैधतेची कालमर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. आता विद्यार्थी नीटच्या निकालानंतर तीन वर्षांत परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकतील.