कळंबोलीच्या सेंट जोसेफ विद्यालयात शुक्रवारी विघ्नेश साळुंके (वय ११) या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहाव्या मजल्यावरून पडून झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पालकांच्या व पक्षांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा शाळा व्यवस्थापनाविरोधात हलगर्जीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शाळेचे व्यवस्थापक जॉर्ज, मुख्याध्यापिका मीरा कुंटे आणि संबंधित शिक्षकांवर ही कारवाई केली.
या कारवाईमुळे अवाढव्य शुल्क आकारून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी झटकणाऱ्या खासगी शाळा व्यवस्थापकांचे धाबे दणाणले आहे.
विघ्नेशच्या मृत्यूची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. विघ्नेशचे वडील पोलीस दलात आहेत. त्यांच्यासह इतर पालक व पक्षांनी मंगळवारी व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलन केल्यामुळे अखेर पोलिसांना हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवावा लागला. विद्यार्थी शाळेत गेल्यावर संबंधित विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असते. मात्र शाळा व्यवस्थापन हे मानायला तयार होत नव्हते. उलट विघ्नेशने त्याच्या वैयक्तिक कारणावरून आत्महत्या केल्याचे परिसरात पसरविले जात होते. त्यामुळे विघ्नेशच्या मृत्यू प्रकरणाशी सेंट जोसेफ विद्यालयाचा काहीही संबंध नसल्याचा देखावा शाळेकडून होत असल्याचा आरोप पालकांनी केला. यामुळे अन्य पालकांसमोर त्यांच्या पाल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मंगळवारी याच शाळेत झालेल्या पालक बैठकीत गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी शाळेत प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांची जबाबदारी ही संबंधित शिक्षण संस्थेची असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले. विघ्नेशच्या मृत्यूनंतर शाळा व्यवस्थापनाने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या. त्यामध्ये पॅसेजमध्ये रातोरात लोखंडी ग्रिल लावण्यात आले, तर विद्यार्थी वर्गात येण्याअगोदर शिक्षक वर्गात येऊ लागले.