कांदिवली येथून गेले दीड महिना बेपत्ता असलेल्या १४ वर्षीय मुलीची तिच्याच शेजाऱ्याकडून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. शेजारील तरुणाने तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न करत हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने मृतदेह एका बॅगमध्ये भरला आणि बाईकवरुन ९० किमी दूर प्रवास करत तलासरी येथे नेऊन जाळला होता.

नववीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी आपल्या आई-वडिलांसोबत चाळीत राहत होती. २५ वर्षीय आरोपी तिथेच बूट पॉलिश करण्याचं काम करायचा. पीडित मुलीच्या कुटुंबाशी त्याची ओळख होती. १ ऑक्टोबर रोजी मुलगी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलीचा मोबाइल रेकॉर्ड तपासत बेपत्ता होण्याआधी ज्यांच्याशी संपर्क केला होता त्या सर्वांची चौकशी केली. यावेळी मुलीचे आई. वडील, मित्र आणि आरोपीचीही चौकशी झाली होती.

संशय येऊ नये यासाठी आरोपी जेव्हा कधी पोलीस चौकशीसाठी बोलवत असत तेव्हा तो हजर राहायचा. आरोपीने मुलगी बेपत्ता झाली तेव्हा आपण कांदिवलीत होतो असं भासवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मोबाइलचं लोकेशनही कांदिवली दाखवत होतं. समता नगर पोलिसांकडेही त्याचा दावा फेटाळण्यासाठी ठोस पुरावा नव्हता.

१६ नोव्हेंबर रोजी पोलिसांना त्याच्याकडे अजून एक मोबाइल असल्याचं लक्षात आलं, ज्याचं लोकेशन मुलगी बेपत्ता झाली त्यादिवशी तलासरी होतं. पोलिसांनी तलासरीला का गेला होता याबद्दल चौकशी केली असता आरोपीने हत्या केल्याची कबुली दिली.

आरोपीने पोलिसांना सांगितलं की, १ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मुलगी घरी एकटी होती. आपण तिच्यावर जबरदस्ती केली असता तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यामुळे भीतीपोटी तिच्या डोक्यात बाटलीने वार करत केला. आरडाओरड करु नये यासाठी आरोपीने तिचा गळा दाबला. यानंतर तिचा मृतदेह बॅगेत भरला आणि बाईकवरुन तलासरी येथे नेला.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आरोपीने बॅगेसहित मृतदेह जाळला. मात्र मृतदेह पूर्ण जळला नाही. ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी मृतदेह सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.