ऐन दिवाळीच्या तोंडावर वर्तकनगर येथील निओसिम उद्योग लिमिटेड ही वाहनांकरिता लागणाऱ्या धातूंचे भाग तयार करणाऱ्या कंपनीचे युनिट बंद करण्याची नोटीस सोमवारी कंपनी व्यवस्थापनाने जाहीर केल्याने सुमारे ५०० कामगारांवर बेकारीची कु ऱ्हाड कोसळली आहे. ऑटोमोबाइल उद्योगातील मंदी तसेच उत्पादनात ८० टक्के घट झाल्यामुळे कंपनीचे युनिट बंद करण्यात येत असल्याचे कारण व्यवस्थापनाने दिले आहे.  
वर्तकनगर परिसरात निओसिम उद्योग लिमिटेड या कंपनीचे युनिट आहे. भांडुप तसेच पुणे येथेही कंपनीचे युनिट असून त्यापैकी भांडुप येथील युनिट कंपनीने नुकतेच बंद केले आहे. वाहनांकरिता लागणाऱ्या धातूचे पार्टस् (ऑटो कॉस्टिंग प्रोडक्शन) या कंपनीत तयार करण्यात येतात.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्तकनगर येथील युनिटमध्ये सुमारे ५०० कामगार काम करीत होते, त्यापैकी ९३ कामगार कायमस्वरूपी, २८ कामगार करार पद्धतीवर, १८ सुरक्षारक्षक आणि उर्वरित सुमारे ३५० कामगार ठेका पद्धतीने काम करीत आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक गेली २० वर्षे या कंपनीत काम करीत आहेत. सोमवारी सकाळी कामगारांनी नोटीस बघताच  कंपनीत शिरण्याचा प्रयत्न करून पाहिला, मात्र पोलिसांच्या मदतीने त्यांना कंपनीत जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे कामगारांनी घोषणाबाजी केली.
युनिटमधील सर्वच कामगारांना तुटपुंजा पगार असून भरपगारी सुट्टी तसेच बोनस अशा सुविधा कामगारांना मिळत नाहीत. यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन तसेच मोर्चाही काढला होता, परंतु जिल्हा प्रशासनाने या आंदोलकांची दखल घेतली नाही, असा आरोप महानगर कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी केला. गेल्या चार महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापन महिनाअखेर वीज, पाणी नाही, असे सांगत कंपनी बंद ठेवत होती. तसेच युनिट बंद करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाच्या हालचाली सुरू होत्या, त्यामुळे औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, कंपनी बंद करू नये, असे औद्योगिक न्यायालयाने आदेश दिले होते. त्याची मुदत नुकतीच संपल्यानंतर न्यायालयाने पुन्हा वाढवून दिलेली असतानाही व्यवस्थापनाने हा निर्णय घेऊन न्यायालयाचा अवमान केला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी कंपनीचे व्यवस्थापक िशगोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी मी बोलू शकत नाही, याविषयी एचआर विभागाशी संपर्क साधा, असे त्यांनी सांगितले. मात्र ते बोलतील का हे मी तुम्हाला सांगणार नाही, असेही िशगोटे म्हणाले.
मान्यताप्राप्त युनियन नावापुरतीच..
इंडियन स्मेलटिंग अ‍ॅण्ड रिफायनिंग कंपनी लिमिटेड या कंपनीचे नाव बदलून निओसिम उद्योग लिमिटेड असे करण्यात आले. या कंपनीत पूर्वी काम करणारे कामगार श्रमिक सेना या कामगार संघटनेशी संलग्न होते. या कामगारांची सेवानिवृत्ती झाल्यानंतरही कंपनीत हीच संघटना मान्यताप्राप्त आहे. युनिटमधील एकही कामागार या संघटनेचा सभासद नाही, तसेच आमची संघटना मान्यताप्राप्त नाही. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आमच्या संघटनेशी बोलणी करण्यास तयार नाही, अशी माहिती महानगर कामगार युनियनचे अध्यक्ष शरद खातू यांनी दिली.
बिल्डरसाठी व्यवस्थापनाचा आटापिटा..
निओसिम उद्योग लिमिटेड या कंपनीने भांडुप येथील युनिट बंद करून कंपनीची जागा बिल्डरला विकली आहे. त्याचप्रमाणे ठाणे येथील वर्तकनगर परिसरातील युनिट बंद करून ती जागा एका बडय़ा बिल्डरला विकण्याच्या व्यवस्थानाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच हे युनिट बंद करण्यात आले आहे, असा आरोप युनियनचे अध्यक्ष शरद खातू यांनी केला आहे.
बंद करण्याची कारणे..
ऑटोमोबाइल उद्योगातील प्रचलित मंदी, कच्च्या मालाच्या अस्थिर किमती, उत्पादनात ८० टक्के घट, ग्राहकांकडून उत्पादनाची कमी मागणी, अशा स्वरूपाची १७ कारणे नोटीसवर देण्यात आली आहेत.