हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र आणि सूर्याइतकीच लख्ख आहे असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. कंगना रणौतने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधात आवाज उठवला त्याबद्दल काय मत आहे असा प्रश्न उर्मिला मातोंडकर यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. माझा कट्टा या एबीपी माझाच्या कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर आल्या होत्या. याच कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ९० च्या दशकात १५ ते १६ अभिनेत्री माझ्यासोबत आल्या होत्या. त्यातल्या ११ ते १२ नट्या या कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या. त्यामुळे घराणेशाही किंवा नेपोटेझिम हे आज आलेलं नाही. ते अनेक वर्षांपासून आहे. हे फक्त बॉलिवूडमध्येच नाही. तर प्रत्येक क्षेत्रात आहे असंही त्या म्हणाल्या.

रंगीला हा सिनेमा मी केला तेव्हा अनेकांना वाटलं की मी त्यात अभिनय केलाच नाही मी फक्त छोटे कपडे घालून नाचले. अनेक लोकांनी त्यावेळी असाच समज करुन घेतला होता. एका प्रख्यात मराठी दिग्दर्शकानेही मी त्यांचा चित्रपट नाकारल्याने माझ्यावर टीका केली आहे. त्या काळात सोशल मीडिया नव्हता. नेपोटिझम हा खूप काळापासून आहे. सुशांत सिंंह राजपूतने आत्महत्या केली ही दुर्दैवी बाब आहे. मी त्यानंतर जे ट्विट केलं होतं त्यात पहिला शब्द नेपोटिझम होता. सुशांत सिंह राजपूत हा एक चांगला अभिनेता होता. त्याच्या मृत्यूनंतर जो काही तमाशा केला जातो आहे तो दुर्दैवी आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

एक अभिनेत्री असल्याचा, मराठी असल्याचा मी त्रास सहन केला आहे, मी अनेक गोष्टी भोगल्या आहेत. मी त्यावेळी नेपोटिझमबद्दल बोलले नाही. मात्र आत्ता मी या सगळ्या गोष्टी बोलते आहे. त्यावेळी मराठी लोकांना घाटी असंही संबोधलं जात होतं असंही उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं. त्या काळात नेपोटेझिमचा मी मोठ्या प्रमाणावर सामना केला असंही उर्मिला यांनी स्पष्ट केलं.