रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळताच उपनगरी सेवा कार्यान्वित; लोकलच्या वेगचाचणीस सुरुवात

मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरण या उपनगरीय मार्ग प्रकल्पातील नेरुळ ते खारकोपपर्यंतचा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी बुधवारी दिली. सध्या या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीची आवश्यकता असून त्याची पूर्तता केली जात आहे. ऑक्टोबपर्यंत पहिला टप्पा सेवेत येणार होता.

या मार्गावर गुरूवारी वेगाची चाचणी करण्यात आली. या मार्गाच्या पुढील काळात आणखी काही चाचण्या करण्यात येणार असून प्रवाशांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने उरणला उपनगरीय रेल्वे मार्गाने नवी मुंबईशी जोडले जाणार आहे. त्यासाठी १९९७ सालापासून हा प्रकल्प हाती घेतला. २० वर्षे उलटूनही हा मार्ग सुरू होऊ शकला नाही. हार्बर व ट्रान्स हार्बर प्रवाशांकडून या नवीन मार्गासाठीची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पात प्रत्यक्षात रेल्वे बोर्डानेही लक्ष घातले व यातील नेरुळ ते खारकोपपर्यंतचा पहिला टप्पा त्वरित सेवेत आणण्याचे आदेशही दिले. भविष्यात नवी मुंबई विमानतळही होणार असल्याने हा प्रकल्प महत्त्वाचाही मानला जातो. याची माहिती देताना महाव्यवस्थापक शर्मा यांनी नेरुळ ते खारकोपपर्यंतचा पहिला टप्पा दिवाळीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न आहे. काही तांत्रिक कामे पूर्ण करण्यात येत आहेत. मार्ग सेवेत आणण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्त त्याची पाहणी करतील. त्यासाठी आयुक्तांची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्तावही त्यांचाकडे पाठविण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले.

सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग २०२२ मध्ये

सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग मार्च २०२२ पर्यंत पूर्ण केला जाईल. सध्या या मार्गातील कुर्ला ते परळ टप्पा पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम हे आधीच पूर्ण झाले आहे. ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग आणि सीएसएमटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाचेच काम बाकी आहे.

  • १,७८२ कोटी रुपयांवर नेरुळ ते उरण रेल्वे प्रकल्पाचा अंदाजित खर्च पोहोचला आहे.
  • प्रकल्पात मार्गाचे काम, जमीन हस्तांतरण आणि नवीन लोकल गाडय़ांचा समावेश आहे. प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील सर्व संबंधित बाबी सिडकोकडूनही पूर्ण करण्यात आल्या आहेत.

स्टंट करणाऱ्यांकडून जास्त दंड

लोकलमधून प्रवास करताना काही व्यक्ती लोकलच्या टपावर आणि दरवाजाजवळ उभे राहून स्टंट करतात. या प्रकारांना आळा बसविण्यासाठी त्यांच्याकडून जास्त दंड वसूल केला जाऊ शकतो का, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे विचारणा करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याशिवाय दिवा-आंबिवलीचे गेट मार्च २०१९ पर्यंत बंद करतानाच मध्य रेल्वेवरील ६० रेल्वे स्थानकांवर वायफाय, सर्व उड्डाणपूल राज्य सरकार बांधणार, महिला प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी जनजागृती मोहीम आणि पुढील वर्षांत वातानुकूलित लोकल येणार असल्याचेही सांगण्यात आले.

  • स्थानके- नेरुळ, सीवूड-दारावे, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावा शेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी, उरण