News Flash

नेस्को करोना केंद्रात १५०० नवीन रुग्णशय्या

नेस्को करोना केंद्रातील रुग्णशय्यांची क्षमता तीन हजार ७०० इतकी झाली आहे.

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को मैदानात उभारलेल्या समर्पित करोना आरोग्य केंद्रात दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध करण्यात आलेल्या एक हजार ५०० रुग्णशय्यांचे नुकतेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यापैकी एक हजार रुग्णशय्या प्राणवायुपुरवठा सुविधेसह उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे नेस्को करोना केंद्रातील रुग्णशय्यांची क्षमता तीन हजार ७०० इतकी झाली आहे.

या केंद्रातील ई सभागृहात या रुग्णशय्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुग्णशय्येनजीक पंखा, लॉकर व खुर्ची उपलब्ध करण्यात आली आहे. आज २०० रुग्णशय्या कार्यान्वित करून या सभागृहातील सेवा सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने सर्व रुग्णशय्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ई सभागृहात एकूण सहा कक्ष आहेत. प्रत्येक कक्षामध्ये २५० ते ३०० रुग्णशय्यांची क्षमता आहे. सर्व कक्षांमध्ये केंद्रीकृत वातानुकूलन सुविधा आहे. तसेच प्रत्येक कक्षामध्ये दोन नर्सिंग स्टेशन, एक अन्न वितरण विभाग, एक अग्नी नियंत्रण कक्ष, समवेत २४ बाय ७ तत्त्वावर कार्यरत फार्मसी कौन्सिलिंग रूम, रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षही आहे. एकूण आठ नोंदणी कक्ष, एक निरीक्षण कक्ष (१० रुग्णशय्या), एक क्ष-किरण विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या नवीन सुविधेसाठी एकूण एक हजार १०० मनुष्यबळ आहे. त्यात ५० सीनियर कन्सल्टंट, १६० निवासी वैद्यकीय  अधिकारी, ३२० परिचारिका, ४८० रुग्णसेवा सहायक आणि ९० तांत्रिक कर्मचारीवर्ग यांचा समावेश आहे. दरम्यान, नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण दोन हजार २०० रुग्णशय्या कार्यान्वित केल्या होत्या. त्यामध्ये २०० एचडीयू रुग्णशय्या तर ३०० प्राणवायुपुरवठा सुविधा असलेल्या रुग्णशय्या होत्या.  या लोकार्पण सोहळ्यास माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, अधिष्ठाता (टप्पा १) डॉ. नीलम अंद्रादे, अधिष्ठाता (टप्पा २) डॉ. राजेश डेरे व अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. नितीन सलागरे उपस्थिती होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:10 am

Web Title: nesco corona center akp 94
Next Stories
1 लसीकरणासाठी भाजप नगरसेवकांचे आंदोलन
2 नायरमध्ये १००१ करोनाबाधित मातांची सुखरूप प्रसूती
3 बालसंग्रहालय ऑनलाइन व्यासपीठावर
Just Now!
X